पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांना हंपी येथे नेण्यात येणार असलेल्या अभ्यास सहलीतून जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याने त्याविरोधात त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. विभागप्रमुखांनी जाणीवपूर्वक संशोधक विद्यार्थ्यांना यापासून दूर ठेवण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.तत्त्वज्ञान विभागाच्या अभ्यास सहलीसाठी २ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार कर्नाटकातील हंपी येथे अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी या सहलीची तारीख १९ फेब्रुवारी २०१९ रोजी ठेवण्यात आली होती. मात्र या दिवशी विद्यार्थ्यांनी शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याने या तारखेत बदल करण्याची विनंती विद्यार्थ्यांनी विभागप्रमुखांकडे केली होती. मात्र त्यानंतर विभागप्रमुखांनी जाणीवपूर्वक ही विनंती करणाऱ्या विद्यार्थ्यांना सहलीपासून दूर ठेवण्यासाठी संशोधक विद्यार्थ्यांना अभ्यास सहलीसाठी न घेऊन जाण्याचा निर्णय घेतला असल्याची तक्रार संशोधक विद्यार्थी मारुती अवरगंड, श्रीनिवास भिसे यांनी कुलगुरूं कडे केली आहे. यासाठी त्यांनी बुधवारपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. अभ्यास सहलीसाठी २ लाख रुपयांची तरतूद असल्याने या सहलीसाठी ४० ते ४५ विद्यार्थ्यांना अभ्यास सहलीसाठी घेऊन जाता येऊ शकते. या सहलीसाठी एमएचे २३ विद्यार्थी आणि कर्मचारी अशा एकूण ३० जणांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. त्यामुळे आणखी दहा जणांना या सहलीसाठी घेऊन जाणे सहज शक्य आहे. त्यामुळे या जागांवर संशोधक विद्यार्थ्यांना घेऊन जाणे आवश्यक होते. मात्र विभागप्रमुखांनी जाणीवपूर्वक संशोधक विद्यार्थ्यांना यापासून वगळले आहे, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. तत्त्वज्ञान विभागाच्या या निर्णयाविरोधात बुधवारपासून संशोधक विद्यार्थ्यांनी मुख्य इमारतीसमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.विभागप्रमुखांशी चर्चा करून निर्णय घेऊ...तत्त्वज्ञान विभागाच्या संशोधक विद्यार्थ्यांना अभ्यास सहलीतून वगळण्यात आल्याबाबत करण्यात आलेल्या तक्रारीबाबत तत्त्वज्ञान विभागाच्या प्रमुखांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. - डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
संशोधक विद्यार्थ्यांना अभ्यास सहलीतून वगळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 3:39 AM