पुणे शहर काँग्रेसमध्ये धूसफूस : प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार करणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 07:22 PM2018-10-19T19:22:46+5:302018-10-19T19:28:23+5:30

संघटनेअभावी शहरातील पाया भुसभूशीत झाला असूनही काँग्रेसला राजकीय शहाणपण यायला तयार नाही. पक्षातील ज्येष्ठांमध्ये याविषयी तीव्र नाराजी असून त्यातील काहींनी यासंदर्भात थेट पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.  

Resentment in Congress party at Pune city : complaint to state president | पुणे शहर काँग्रेसमध्ये धूसफूस : प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार करणार 

पुणे शहर काँग्रेसमध्ये धूसफूस : प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार करणार 

Next
ठळक मुद्देपदाधिकाऱ्यांकडून सरचिटणीसांचा अवमान चमकोंना अभय : निष्ठावानांवर अन्यायशहर सरचिटणीसांवर मतदारसंघांचे नियोजन करण्याची जबाबदारी

पुणे: संघटनेअभावी शहरातील पाया भुसभूशीत झाला असूनही काँग्रेसला राजकीय शहाणपण यायला तयार नाही. ताज्या घडोमोडीत एका ब्लॉक अध्यक्षाने शहर सरचिटणीसाचा अवमान केल्यानंतरही ब्लॉक अध्यक्षाला अभय व सलग ३० वर्षे प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला संघटनेपासून दूर करण्याचा प्रकार काँग्रेसच्या शहर शाखेत घडला आहे. पक्षातील ज्येष्ठांमध्ये याविषयी तीव्र नाराजी असून त्यातील काहींनी यासंदर्भात थेट पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.  
अखिल भारतीय काँग्रेस महासमितीने वेगवेगळ्या राज्यात निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. पश्चिम महाराष्ट्रासाठी अशाच निरीक्षक म्हणून नियुक्त झालेल्या सोनाली पटेल नुकत्याच पुण्यात येऊन गेल्या. त्यांनी काँग्रेस भवन येथे पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यांच्याबरोबर चर्चा करून त्या माहिती घेत होत्या. पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातील ब्लॉक अध्यक्षांनाही यासाठी बोलावण्यात आले होते. पटेल व पदाधिकाऱ्यांमधील चर्चा बराच वेळ सुरू असल्यामुळे मतदारसंघांना वेळ लागत होता.  
शहर सरचिटणीसांवर मतदारसंघांचे नियोजन करण्याची जबाबदारी होती. अध्यक्षांच्या सल्ल्याने त्यांनी क्रमांक निश्चित केले होते. एका विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षाने शहर सरचिटणीसांना हा क्रम बदलून त्यांचा विधानसभा मतदार संघ आधी घेण्यास सांगण्यास सुरूवात केली. ‘तुम्ही अध्यक्षांबरोबर बोला, त्यांनी सांगितले तर लगेच बदल करू’ असे उत्तर शहर सरचिटणीसांनी दिले. त्यावर राग येऊन संबधित ब्लॉक अध्यक्षांनी शहर सरचिटणीसांना थेट शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. इतकेच नाही तर त्यांची कॉलर धरून त्यांना ढकलत जिन्याच्या भिंतीजवळ नेले.   
‘‘तुम्हाला मारेलच’’, ‘‘मी काय आहे ते दाखवू का’’ अशा धमक्या देण्यास सुरूवात केली. पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी संबधित ब्लॉक अध्यक्षांना मागे घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी ‘तुम्ही मध्ये पडू नका, तुम्हालाही त्रास होईल’ असे त्यांनाच ऐकावे लागले. भांडणाचा आवाज ऐकून तरी जबाबदार पदाधिकारी येतील व ब्लॉक अध्यक्षांना समजावून सांगतील अशी शहर सरचिटणीसांची अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. उलट ‘तुम्ही कशाला उगाच भांडणे करत बसलात’ म्हणून त्यांनाच ऐकून घ्यावे लागले.  
जबाबदार पदाधिकारी संबधित बेशिस्त पदाधिकाऱ्याला पाठिशी घालत आहेत हे लक्षात येताच शहर सरचिटणीसांनी काँग्रेस भवनमधून त्वरीत निघून जाणे पसंत केले. ‘प्रामाणिकपणे वेळ देवून, कसलीही अपेक्षा न धरता काम केल्याचा हा सन्मान झाला’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आठ दिवसांपुर्वी झालेल्या या घटनेनंतर त्यांनी अद्याप काँग्रेस भवनात पाय ठेवलेला नाही. काही ज्येष्ठ काँग्रेस पदाधिकाऱ्यांना माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांच्या काँग्रेस भवनातील कार्यक्रमात त्यांची अनुपस्थिती जाणवली व ही घटना उघड झाली. ‘जबाबदार पदाधिकारीच अशा बेजबाबदार वागणाऱ्यांना पाठीशी घालू लागले तर पक्षात कसली शिस्त व कसले शहाणपण राहणार’ अशी भूमिका घेत त्यांच्यातील काहींनी या प्रकाराबाबत थेट प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरू आहे. 

Web Title: Resentment in Congress party at Pune city : complaint to state president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.