पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर देशात इंडिया आघाडीचे सरकार आले तर देशात आरक्षणासाठी असलेली ५० टक्के मर्यादा हटविण्यात येईल. दलित १५ टक्के, आदिवासी ८ टक्के आणि मराठा, धनगर यांसह मागासलेला वर्ग ५० टक्के असे एकूण ७३ टक्के आरक्षण दिले जाईल, अशी घोषणा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुण्यातील जाहीर सभेत केली.
नरेंद्र मोदी आणि भाजपला संविधान मिटवायचे आहे, असा गंभीर आरोपही गांधी यांनी यावेळी केला. संविधान संपवण्याचा प्रयत्न म्हणजे या देशाची ओळख संपविण्याचा प्रयत्न आहे. आम्ही महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान कधीही संपवू देणार नाही, असेही ते म्हणाले.
पुणे लाेकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची शुक्रवारी जाहीर सभा झाली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, उल्हास पवार, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ॲड. वंदना चव्हाण , दिप्ती चौधरी, उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष गजानन थरकुडे, आपचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे उपस्थित होते.
राहुल गांधी म्हणाले, काँग्रेस आणि महाविकास आघाडी लोकशाही वाचविण्यासाठी लढत आहे. ज्या भारतीय लोकांनी लढाई करून संविधान बनविले त्याला भाजपकडून मिटविण्याचा प्रयत्न केला जात आहे. संविधानाने दलित, आदिवासी, मागासवर्गीय आणि गरिबांना आधार मिळाला आहे. मात्र तोच आधार काढून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. संविधान नसेल तर केवळ २५ लोकांच्या हातात देश जाईल. मोदींनी २२ लोकांचे १६ लाख करोड रुपयांचे कर्ज माफ केले आहे. मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विचार केला जात नाही. देशातील ९० टक्के लोक मनरेगातून आणि इतर साधी कामे करीत आहे. दलित आदिवासी यांना शोधायचे असेल तर कामगाराच्या यादीत शोधावे लागेल अशी सध्याची परिस्थिती आहे.
जातीवर आधारित जणगणना केली जाणार :
आमचे सरकार आल्यावर जातीवर आधारित जनगणना केली जाईल. त्या-त्या जातीच्या संख्येनुसार सर्वांना संधी दिली जाणार आहे. इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर देशात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली जाईल. त्याचबरोबर अग्निवीर योजनेसह जीएसटी कर बंद केला जाईल. सध्या पेपरफुटीचे प्रमाण वाढले आहे. पेपर लिक करणाऱ्यांनाही कडक शिक्षा दिली जाईल. सर्व पेपर सरकारी आयोगामार्फत घेतले जातील.
ज्येष्ठ नेत्याचा अपमान करणे पंतप्रधान पदाला शोभते का?
चारशे महिलांवर बलात्कार करणाऱ्या रेवण्णासाठी नरेंद्र मोदी कर्नाटकात मते मागत आहेत. ज्या व्यक्तीने एवढे अत्याचार केले. त्यांच्यासाठी मोदी प्रचार करत आहेत. सध्या मोदी कधी पाकिस्तानचा मुद्दा आणत आहेत तर कधी समुद्राच्या खाली जाऊन स्टंट करतायत. ज्येष्ठ नेत्यांचा (शरद पवार) अपमान करण्यात नरेंद्र मोदी व्यस्त आहेत. असे वागणे देशाच्या पंतप्रधान पदाला शोभत नाही, म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधानांवर प्रहार केला.
माध्यमांनाही खडेबोल :
बड्या माध्यमांमध्ये गरीब किंवा दलित व्यक्ती कधीच दिसणार नाही. केवळ अंबानीची लग्नं दाखवण्यात माध्यमे व्यस्त आहेत. हे पत्रकार सामान्यांचे नसून, अदानींचे आहेत. शेतकरी मरतोय, महागाई वाढली आहे. सीबीआय ईडीचा दबाव टाकला जातोय पण माध्यमे काहीच बोलणार नाहीत, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी माध्यमांनाही खडेबोल सुनावले.