पुणे : मराठा आरक्षणाची मागणी १९८५ पासून केली जात आहे. आजवर मराठा मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देण्याची धमक दाखविली नाही. तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले आणि ५० वर्षांची राजकीय कारकीर्द असलेले शरद पवारही आरक्षण देऊ शकले नाहीत. ते आरक्षण देण्याची हिम्मत देवेंद्र फडणवीस यांनी दाखविली. तेसुद्धा या सरकाराला टिकविता आले नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावर नेमके काय करणार आहात, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार संजय काकडे यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना काकडे म्हणाले, मुख्यमंत्री मुंबईचे आणि उपमुख्यमंत्री पुण्याचे तरीही याच दोन शहरांत कोरोनाचा प्रादुर्भाव का वाढला? हे नेते फक्त सभागृहात बसून बैठका घेतात. मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांमध्ये ताळमेळ नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. आयएएस अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या पाहिजेत. मुख्यमंत्र्यांनी घरातून बाहेर पडावे, लोकांमध्ये फिरावे तेव्हा खरी परिस्थिती समजेल. तीन पक्षाच्या खिचडीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुदमरत आहेत. त्यांचा स्वभाव मला माहिती आहे. या खिचडीत ते कसे अडकले माहिती नाही. पण ते लवकरच यातून बाहेर पडतील.
गजा मारणे प्रकरणाशी संबंध नसताना माझ्यावर कारवाई करण्यात आली. सत्तेचा गैरवापर केला जात आहे. ज्या सोशल मीडियाचा दाखला दिला गेला त्यावर माझे अकाऊंट नाही, असेही त्यांनी सांगितले.