सासवड : नागरी विमान वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी पुन्हा पुरंदर तालुक्यात दुपारी राजेवाडी - वाघापूरमधील जमिनीची पाहणी हेलिकॉप्टरमधून केली. तसेच पुरंदरच्या पूर्व भागातील आणखी काही ठिकाणांची पाहणीही संबंधित अधिकऱ्यांच्या पथकाने केली. आंतरराष्ट्रीय कार्गो विमानतळासाठी नागरी विमान वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने काही दिवसांपूर्वीच खेड तालुक्यातील कडूस - कोये तसेच दौंड तालुक्यातील डाळींब, हवेली तालुक्यातील शिंदवणे आणि पुरंदर तालुक्यातील वाघापूर परिसरातील जागेची पाहणी केली होती. रविवारी (दि.११) दुपारी पुन्हा राजेवाडी - वाघापूरमधील जमिनीची पाहणी संबंधित विभागाने हेलिकॉप्टरमधून केली. तसेच पुरंदरच्या पूर्व भागातील आणखी काही ठिकाणांची पाहणीही संबंधित अधिकाऱ्यांच्या पथकाने केली. या विमानतळासाठी ५ किमी. लांबी आणि २ किमी. रुंदी असणारी साधारण १८०० हेक्टर जमीन तसेच या ठिकाणी टेकड्या किंवा डोंगर यांचे अडथळे नसलेली सपाट जमीन असणे आवश्यक आहे. अशा प्रकारची जमीन पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात अनेक ठिकाणी आहे. मात्र, संबंधित विभागाच्या रेखांश आणि अक्षांशाप्रमाणे आणि सासवड आणि शिंदवणे घाट जवळ असलेल्या ठिकाणाची निवड होणार असल्याचे समजते. यामध्ये दौंड आणि हवेलीतील डाळींब - शिंदवणे किंवा पुरंदर तालुक्यातील वाघापूर - राजेवाडी अथवा एखतपूर - मुंजवाडी, पारगाव - मेमाणत या जागांचा विचार होऊ शकतो. दोन दिवसांत मुंबई येथे विमानतळासाठी पुरंदरमध्ये पाहणी केलेल्या जमिनींबाबत बैठक होणार असून, विमानतळ पुरंदरमध्ये होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. (वार्ताहर)