पुणे : लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर १ जूनपासून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या आरक्षणासाठी मोजक्या रेल्वे स्थानकांवरील तिकीट खिडक्या उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पुणे रेल्वे स्थानकांवर तीन तिकीट खिडक्या उघडण्यात आल्या असून तिथे आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुण्यासह चिंचवड, तळेगाव व बारामती रेल्वे स्थानकातील प्रत्येकी एक खिडकी सुरू करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.रेल्वे मंत्रालयाने दि. १ जूनपासून देशभरात २०० रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातून केवळ दानापुर ही एकच थेट गाडी असेल. मात्र मुंबईतून सुटणाऱ्या पाच एक्सप्रेस पुणे मार्गे धावणार आहेत. सुरूवातीला रेल्वेने आरक्षण केवळ ऑनलाईन माध्यमातूनच करता येईल असे जाहीर केले होते. त्यानुसार गुरूवारी पहिल्याच दिवशी आरक्षणाला मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र, ऑनलाईन आरक्षण न करता येऊ शकलेल्या नागरिकांसाठी स्थानकांवरील आरक्षण खिडक्या उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मध्य रेल्वेच्या पुणे विभागात ११ तिकीट खिडक्यांवर आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पुणे रेल्वे स्थानकावर तीन खिडक्या उघडण्यात आल्या आहेत. तसेच जिल्ह्यात बारामती, तळेगाव, चिंचवड या स्थानंकावर प्रत्येकी एक खिडकी असेल. तर कोल्हापुर, मिरज, सांगली, सातारा व कराड येथेही प्रत्येकी एक खिडकी खुली राहणार आहे. दरम्यान, आरक्षण खिडकीबाहेर सुरक्षित अंतरासाठी चौकोन करण्यात आले आहेत. त्या चौकानामध्ये उभे राहावे लागणार आहे. तसेच तोंडाला मास्क लावणेही बंधनकारक करण्यात आले आहे. शुक्रवारी तिकीट खिडक्या उघडण्यात आल्या असल्या तरी तुरळकच प्रवासी होती. अनेक जण आॅनलाईन आरक्षणालाच पसंती देत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.