पुणे : मागील वर्षभर पुणेकरांच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या पालिका कर्मचारी, अधिकारी व त्यांचे कुटुंबीयांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडसाठी वणवण करावी लागत आहे. या सेवकांसाठी पालिका प्रशासनाने किमान १०० खाटांचे रुग्णालय राखीव ठेवावे. प्रत्येक रुग्णालयात किमान दोन व्हेंटिलेटर खाटा राखीव ठेवण्याची मागणी पीएमसी एप्लॉईज युनियनच्या वतीने महापौरांकडे करण्यात आली आहे.
पालिकेची सर्व यंत्रणा मार्च २०२०पासून कोरोना आटोक्यात आणण्याकरिता अहोरात्र काम करत आहे. आतापर्यंत पालिकेचे १ हजार ४०० सेवक कोरोनामुळे बाधित झाले आहेत, तर ५५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांनाही कोरोना होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यांनाही खाटा मिळत नाहीत. पालिकेने सेवक व त्यांच्या कुटुंबीयांवरील उपचारासाठी १०० खाटा उपलब्ध करून द्याव्यात. सारसबाग येथील सणस मैदानावरील विलगीकरण कक्षात ही व्यवस्था करावी. तसेच पालिकेच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांतील अतिदक्षता विभागातील किमान दोन खाटा राखीव ठेवाव्यात, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे युनियनचे अध्यक्ष प्रदीप महाडीक आणि कार्याध्यक्ष आशिष चव्हाण यांनी केली आहे.