पुणे : सातवा वेतन आयोग व शासन सेवेत कायमस्वरूपी नियुक्तीसाठी ससून रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही(आरएमओ) आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. सहायक प्राध्यापकांपाठोपाठ मंगळवार (दि. ३) पासून रुग्णालयातील २४ आरएमओंनी काळी फित लावून काम करण्यास सुरूवात केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास ९ तारखेपासून काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील ५९ सहायक प्राध्यापकांनी सोमवारपासून सामुहिक रजा आंदोलन सुरू केले आहे. सहा महिने ते सहा वर्ष सेवा करूनही त्यांना सेवेत कायम करण्यात आलेले नाही. तसेच सातवा वेतन आयोगही लागु झालेला नाही. या दोन मागण्यांसाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. पण मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला आता आरएमओंनीही पाठिंबा दिला आहे. त्यांनाही शासन सेवेत नियुक्ती मिळण्याची प्रतीक्षा आहे. रुग्णालयातील २४ जणांनी अधिष्ठाता मुरलीधर तांबे यांना याबाबतचे निवेदन दिले. त्यांनी काळ्या फिती लावुन काम करण्यास सुरूवात केली आहे. तसेच सकाळी रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सहायक प्राध्यापकांसह निदर्शने करून घोषणा देण्यात आल्या. दि. ८ तारखेपर्यंत काळी फित लावून काम केले जाणार आहे. मात्र, तोपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास ९ तारखेपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
-------------... तर व्यवस्थापन कोलमडणारवैद्यकीय अधिक्षक कायालयांतर्गत आरएमओचे काम चालते. चोवीस तास रुग्णालयाच्या दैनंदिन व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांच्यावर असते. त्यामुळे त्यांनी काम बंद केल्यास रुग्णालयातील दैनंदिन व्यवस्थापनावर परिणाम होईल. सध्या ओपीडीसह आंतररुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे सोमवारपासून आंदोलनाचा रुग्णसेवेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.-----------