पुणे : सिंहगड रस्त्यावर सध्या दोन किलाेमीटर अंतराचा पूल उभारला जात आहे. या भागातील वाहतूककोंडी फाेडण्यासाठी हा पूल भविष्यात फायदेशीर ठरणार असले तरी, तूर्त या रस्त्यावरून ये-जा करणे मोठे जिकिरीचे झाले आहे. याबाबत ‘लाेकमत’ने वृत्तमालिका प्रसिद्ध करताच महापालिका ॲक्शन मोडवर आली असून, या रस्त्यावर आता ‘नो पार्किंग - नो हॉल्टिंग’चे धोरण अवलंबले जाणार आहे. तसेच सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फन टाइमपर्यंतची दोन्ही बाजूंची अतिक्रमणे सोमवारपर्यंत हटविण्यात येणार आहेत.
दरम्यान, या रस्त्यालगतच्या व्यापाऱ्यांनी येथे बांधलेले ओटे, शेड, रेलिंग स्वत:हून काढून घ्यावेत, असे आवाहन महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने केले आहे. सिंहगड रस्त्यावरील वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. त्यातच या रस्त्यावर सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे रस्त्याच्या मध्यभागी दहा मीटरचा भाग बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आला आहे. परिणामी या ३२ मीटर रुंदीच्या रस्त्यावर सहा-सहा मीटरचाच भाग वाहनांना ये-जा करण्यासाठी मिळत आहे. त्यातही या रस्त्यावरील पडलेले खड्डे, पावसामुळे होणारा चिखल, पुलाच्या कामामुळे मोठ्या वाहनांची वर्दळ, आदी कारणांनी या रस्त्यावरून प्रवास करणे अशक्यप्राय होत आहे.
सोमवारपासून ॲक्शन
महापालिका शहरातील जे पंधरा रस्ते आदर्श बनवणार आहे, त्यात सिंहगड रस्त्याचीही निवड केली आहे; परंतु, सध्याच्या वाहतूककोंडीतून या रस्त्याची मुक्तता करणे हे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे. पथ विभाग, अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम विभाग, प्रकल्प विभाग या सर्वांनी एकत्र येऊन या रस्त्याच्या सुधारणेसाठी प्रयत्न सुरू केले असून, त्याची सुरुवात सोमवारपासून होणार आहे.
हे विभाग करणार कारवाई
१. अतिक्रमण अन् अनधिकृत बांधकाम विभाग : सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फनटाइमपर्यंत पदपथावर रस्त्याच्या बाजूला कोणत्याही फेरीवाल्याला, भाजी विक्रेत्यांना बसण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याचबरोबर ज्या व्यावसायिकांनी रस्त्यावर पुढे ओटे बांधले आहेत, रेलिंग टाकले आहेत, ते हटविण्यात येणार आहे. तत्पूर्वीच व्यापाऱ्यांनी स्वत:हून आपले अतिक्रमण काढावे, असे आवाहन अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी केले आहे. सोमवारपासून या भागात अतिक्रमणांवर कारवाई हाेणार असून, विकास आराखड्यातील रस्त्यांनुसार येथे मूळ रस्त्याचे मार्किंग करण्यात येणार आहे. येथील अतिक्रमण कारवाई ही एक दिवसापुरती मर्यादित न ठेवता, पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. रस्त्यावरील अतिक्रमण काढल्यामुळे दोन्ही बाजूंना साधारणत: दोन मीटर रुंदीचा रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल, असा विश्वास प्रशासनाला आहे.
२. पथ विभाग : सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या कामामुळे अरुंद झालेला रस्ता खड्डेमुक्त करण्यासाठी पथ विभागाने संबंधित क्षेत्रीय कार्यालयास आदेश दिला आहे. येथे कोल्डमिक्सचा व केमिकलचा वापर करून खड्डे बुजविले जाणार आहेत. यामुळे पुन्हा खड्डा उखडणार नाही, ही दक्षता घेतली जाणार आहे. महालक्ष्मी मंदिर सारस बाग ते नांदेड सिटीपर्यंतचा रस्ता खड्डेमुक्त करण्यासाठी अधिकचे मनुष्यबळ वापरून काम केले जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
३. प्रकल्प विभाग : महापालिकेच्या प्रकल्प विभागाकडून या रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. यामुळे रस्त्याच्या मधोमधचा दहा मीटरचा भाग बॅरिकेड्स लावून बंदिस्त केलेला आहे. आता काम पूर्ण झाले आहे, तेथील बॅरिकेड्स एक मीटरने आत सरकवले जातील, अशी माहिती प्रकल्प विभागाचे प्रमुख श्रीनिवास बोनाला यांनी दिली. दरम्यान, येत्या दोन दिवसांत पुलाखालील सर्व खड्डे बुजविण्यात येतील. या रस्त्यावर ब्रह्मा हॉटेल परिसरातच मोठे खड्डे होते ते गुरुवारी रात्री बुजविल्याचेही त्यांनी सांगितले.
काय आहेत अडचणी
१. पुलाच्या कामामुळे रस्ता अरुंद.
२. महापालिकेच्या, विद्युत विभागाच्या विविध सेवावाहिन्यांमुळे रस्ते खोदाई.
३. स्थानिक आस्थापनाकडून सेवावाहिन्यांसाठी होणारी खोदाई.
३. रस्त्याच्या बाजूला असलेले ब्लॉक खचलेले.
४. पदपथावरील आणि रस्त्याच्या बाजूला बसणारे छोटे व्यावसायिक.
५. रस्त्यावरील पार्किंग अन् पोलिसांकडून होणारे दुर्लक्ष.
येथे करा खड्ड्यांची तक्रार :
सिंहगड रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी महापालिका काम करीत आहेत. परंतु नागरिकांनीही सिंहगड रस्त्यावरील खड्ड्यांची माहिती महापालिकेला द्यावी. यासाठी ०२० २५५०२१५३ क्रमांकावर संपर्क करावा.
सिंहगड रस्ता वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी प्राधान्य दिले असून, येत्या सात दिवसांत सारसबाग ते नांदेड सिटीपर्यंत सर्व खड्डे बुजविले जातील. या रस्त्याच्या आजू-बाजूच्या नागरिकांनी येथील रस्ता रुंदीकरणास सहकार्य करावे. स्वत:हून रस्त्यावर केलेेले अतिक्रमण काढावे; अन्यथा क्षेत्रीय कार्यालयांकडून संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका