वारजे : गेल्या महिनाभरात दोन गव्यानी कोथरूड व पाषाण भागात दर्शन दिल्याची घटना ताजी असतानाच आता शिवणे व उत्तमनगर भागात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) तुटलेल्या सीमाभिंतीतून हरणांचं कळप बाहेर लोकवस्तीत आला. सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडला आहे.
शिवणेतील इंगळे कॉलनी येथील ''''आशिर्वाद टेरेस'''' या सोसायटीला लागूनच ‘एनडीए’ची सीमाभिंत आहे. या भिंतीच्या मध्ये बुजवलेला ओढा (कॅनॉल) आहे. ही भिंत अनेक ठिकाणी जीर्ण झाली असून, काही ठिकाणी मोठी फट पडली आहे. एनडीए प्रशासनाने ही फट झाकण्यासाठी काही ठिकाणी पत्रे लावले आहेत. पण त्यातूनही ये-जा करता येते. त्यामुळे या सोसायटीत अनेकदा एखादे हरीण किंवा त्यांचे कळप बाहेर येताना अनेकदा निदर्शनास आले आहेत. सोमवारी देखील संध्याकाळच्या सुमारास असेच एक हरणांचे कळप बाहेर येऊन भटकंती करीत असल्याचे दिसून आले. हा प्रकार वरचेवर होत असल्याने त्यांनी संजय दोडके यांच्या माध्यमातून वन विभागाला याची माहिती दिली. त्यानुसार मंगळवारी (ता २९) वन कर्मचाऱ्यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
आम्ही दोन कर्मचारी पाठवून या ठिकाणी पाहणी केली आहे. या तुटलेल्या भिंतीतून हरण बाहेर येत असल्याचे स्पष्ट होत आहे. एनडीए प्रशासनाला त्याबाबत कळविले असून त्यांना लेखी पत्राद्वारे हे काम प्राधान्याने करून घेण्याची विनंती करणार आहे.
- दीपक पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन विभाग
हरीण अधून मधून दर्शन देत असतात. पण सोमवारी हा कळप मुख्य रस्त्याच्या दिशेने जात असल्याचे दिसल्यावर त्यांना परत आतमध्ये हुसकावले. हा कळप जर रस्त्यावर गेला तर वाहनाच्या धडक बसून , किंवा भटके कुत्रेच्या हल्ल्यात त्यांच्या जिवीतला धोका होऊ शकतो. सीमाभिंत तातडीने दुरुस्त करणे गरजेचे आहे. यामुळे एनडीए ची देखील सुरक्षितता धोक्यात येत आहे.
- अमेय गहीने, रहिवाशी,आशिर्वाद टेरेस, शिवणे