पुणे : मागील दोन वर्षांपासून पुराचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या अरण्येश्वर येथील टांगेवला कॉलनीचे पुनर्वसन होणार आहे. ही वसाहत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून (एसआरए) झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. याबाबतची पूर्वसूचना काढण्यात आली असून नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्याची माहिती स्थानिक नगरसेविका अश्विनी कदम यांनी दिली.
सहकारनगर येथील अरण्येश्वर परिसरात नाल्याला अगदी चिकटून असलेल्या या वसाहतीमध्ये दोन वर्षांपूर्वी २५ सप्टेंबर २०१९ रोजी आलेल्या पुरामुळे वाताहत झाली होती. सात जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर, घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली होती. हातावरचे पोट असलेल्या रहिवाशांच्या या वसाहतीच्या पुनर्वसनाची मागणी नगरसेविका कदम यांच्यासह स्थानिक नागरिकांनी पालिका प्रशासन तसेच एसआरएकडे केली होती. कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वारंवार याबाबत पाठपुरावा केला होता.
एसआरए आणि पालिकेच्या झालेल्या बैठकांमध्ये पुनर्वसनाबाबत विचार झाला. मान्यतेच्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. त्यानंतर एसआरएकडून ही जागा पुनर्वसन क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी ही वसाहत स्थलांतरित केली जाणार असल्याचे नगरसेविका कदम यांनी सांगितले.
-----
दहा वर्षांनंतर पुनर्वसनाचा प्रश्न लागणार मार्गी
एसआरएने घेतलेल्या निर्णयामुळे दहा वर्षांनंतर पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. पुनर्विकासासाठी विकसकाने एसआरएकडे प्रस्तावही सादर केलेला आहे.