लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : अथक परिश्रम व कल्पकतेने शाळेस आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देणारे वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याचे शिक्षणक्षेत्रात तीव्र पडसाद उमटले आहे. वारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राजीनामा मागे घ्यावा, प्रशासनाने वाबळेवाडी शाळेत होणारा बाहेरील व्यक्तींचा हस्तक्षेप त्वरित थांबवावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ सरचिटणीस केशवराव जाधव यांनी केली आहे.
याबाबत शिरूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय नलावडे यांचेकडे मागणी करण्यात आली आहे. या वेळी त्यांच्यासमवेत हनुमंत शिंदे, सुरेंद्र गायकवाड, सोमनाथ चौगुले, राजू बालगुडे, शशिकांत अनपट आदी उपस्थित होते. शिक्षकांना होणारा त्रास न थांबल्यास राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.
बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष हनुमंत शिंदे व सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड यांनी सांगितले, वाबळेवाडी ही जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविलेली शाळा आहे. आपल्या पाल्यास वाबळेवाडी शाळेत प्रवेश मिळावा यासाठी परिसरातील पालकांची इच्छा असते. परंतु वर्गखोल्यांच्या कमतरतेमुळे सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकत नाही. यातून काही पालक नाराज होतात. त्यांच्या नाराजीचा सामना दरवर्षी शिक्षकांना करावा लागतो. यावर्षी साठ जागांसाठी सुमारे दोन हजार चाळीस अर्ज आले होते. त्यापैकी राजकीय व्यक्तींच्या जवळच्या एका पालकांच्या पाल्यास प्रवेश न मिळाल्याने चिडीला जाऊन त्याने शाळेला मिळणाऱ्या ऐच्छिक देणगी संदर्भात पंचायत समितीकडे लेखी तक्रार केली. पंचायत समिती प्रशासनाने राजकीय दबावापोटी तातडीने चौकशी करून शाळा सुधार निधीत अनियमितता असल्याचा अहवाल शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद पुणे यांचेकडे सादर केला. या सर्व प्रकाराने व्यथित होऊन वारे, त्यांचे सहकारी एकनाथ खैरे व केंदूर शाळेचे मुख्याध्यापक जयसिंग नऱ्हे यांनी सेवेचा राजीनामा दिल्याचा आरोप शिक्षक संघाने केला आहे.
————————————————
...आदर्शव्रत काम करणाऱ्या शिक्षकाची चौकशी होणे दुर्दैवी
वास्तविक पाहता शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे काम शाळा व्यवस्थापन समिती करते. शाळेच्या सर्व्हेमधील सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. उर्वरित जागा जो पहिला येईल त्यास प्राधान्य हा निकष लावून भरल्या जातात. शाळासुधार निधी अंतर्गत मिळणारा ऐच्छिक निधी गोळा करणे व त्याचा विनियोग करणे. या सर्व बाबींचे सनियंत्रण शाळा व्यवस्थापन समिती पाहते. असे असताना उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुख्याध्यापकांना यात गोवणे ही बाब संतापजनक आहे. अशा आदर्शव्रत काम करणाऱ्या शिक्षकाची शाळा व्यवस्थापना बाहेरील व्यक्तीच्या तक्रारीवरून चौकशी होणे दुर्दैवी आहे. प्रशासनाच्या भूमिकेमुळे शिक्षकांनी चाकोरीबाहेर जाऊन काम करावे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- केशवराव जाधव, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ
फोटो : मुख्याध्यापक दत्तात्रय वारे आणि एकनाथ खैरे यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत पाठिंबा दिला.
२४०७२०२१ बारामती- ०१