लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : भाजपला पर्याय देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात आपला सहभाग असेल. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाच्या पातळीवर विरोधकांची एकजूट होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यातच मी बाजूला होणे योग्य नसल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यकर्त्यांनीदेखील तीव्र भावना व्यक्त केल्या. त्या सर्व विचारात घेता मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून दूर होण्याचा निर्णय मागे घेतला. राजीनाम्याचा विषय संपला, कामाला लागा, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.
पवार यांचे शनिवारी बारामतीकरांनी जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले, बारामतीसह राज्य व देशातील लोकांच्या आशीर्वादाने मी ५६ वर्षे सक्रिय राजकारण करू शकलो. राज्यसभेची अजून तीन वर्षे शिल्लक आहेत. काही दिवसांपासून वाटत होते की, नव्या लोकांना संधी द्यायला पाहिजे व त्यांनीही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. मी बाजूला होणे, याचा अर्थ घरी बसणे असा नाही. लोकांत, कार्यकर्त्यांत राहणे, त्यांचे प्रश्न सोडविणे, हा मनाशी निश्चय करून मी अध्यक्षपदावरून दूर होण्याचा निर्णय घेतला होता.
पवार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयातील निकाल विरोधात लागला तरी सरकारवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. भाजप व शिंदे सरकारकडे बहुमत आहे.
अजित पवार त्यांचे काम प्रामाणिकपणे करतात
अजित पवार हे त्यांचे काम प्रामाणिकपणे करीत आहेत. काही लोकांना फक्त काम करण्यात इंटरेस्ट असतो, तर काहींचा वृत्तपत्रात बातमी छापून आणण्याकडे कल असतो. अजित पवार हे मीडिया फ्रेंडली नाहीत, हे बऱ्याचशा पत्रकारांना माहीत आहे, अशा शब्दांत अजित पवार यांच्याविषयीच्या चर्चांना शरद पवार यांनी पूर्णविराम दिला.