माळेगाव (पुणे) : माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब तावरे व उपाध्यक्ष सागर जाधव यांनी बुधवारी (दि. ६) अचानक राजीनामा दिला आहे. दोन्ही पदाधिकाऱ्यांचा राजीनामा आज दिवसभर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात चर्चेचा विषय ठरला. ‘माळेगाव’चे नवीन कारभारी कोण, याबाबत उत्सुकता वाढली आहे. बुधवारी अतिशय वेगवान घडामोडी घडत अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी राजीनामे दिले. साधारणतः अध्यक्ष तावरे यांनी ४२ महिने अध्यक्षपदी, तर जाधव यांनी १२ महिने कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले.
अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी राजीनामा देण्यामागची भूमिका स्पष्ट करताना सांगितले, माझ्या जास्तीच्या वयामुळे आणि माझी तब्येत साथ देत नसल्या कारणाने मी राजीनामा देत आहे. हे राजीनामे बारामती तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांच्याकडे सोपविलेले आहेत. त्यांनी ते राजीनामे कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोकराव पाटील यांच्याकडे सुपूर्द केलेले आहेत. कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोकराव पाटील यांनी हे राजीनामे माझ्याकडे आलेले आहेत. ते राजीनामे संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवले जाणार असल्याचे सांगितले.
कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांच्या नावावर टप्प्याटप्प्याने १८ वर्षे चेअरमन पदाचा कार्यभार पाहिलेला आहे. हा एक मोठा विक्रम सहकार चळवळीतील साखर कारखान्याच्या अध्यक्षपदावर काम केल्याची नोंद आहे. मागील हंगामात तुटून आलेल्या उसाला महाराष्ट्रातील सर्वाधिक ऊस दर ३४११ दिला आहे.
पुढील अध्यक्ष पदासाठी प्रामुख्याने संचालक योगेश जगताप, नितीन सातव, मदनराव देवकाते, ॲड. केशवराव जगताप, सुरेश खलाटे, ज्येष्ठ संचालक तानाजी कोकरे इच्छुक आहेत. कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीत अजित पवार यांचा निर्णय अंतिम राहील.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या आतापर्यंतच्या कालावधीमध्ये सातत्याने ऊस उत्पादक शेतकरी सभासद, कारखाना कामगार व अधिकारी यांचे हित डोळ्यासमोर ठेवून काम केले .त्यामुळे माळेगाव साखर कारखाना राज्यात जास्तीचा ऊस दर देण्यात नेहमीच अग्रेसर राहिल्याचे समाधान आहे.
बाळासाहेब तावरे- अध्यक्ष माळेगाव साखर कारखाना.
अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे राजीनामे माझ्याकडे आलेले होते. अजित दादांशी केलेल्या चर्चेनंतर हे राजीनामे मी कार्यकारी संचालक अशोकराव पाटील यांच्याकडे पाठवलेले आहेत.
-संभाजी नाना होळकर- अध्यक्ष बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस.