लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “केंद्र सरकारने कृषी कायद्यात केलेल्या बदलाने बाजार समित्यांचे अस्तित्व संपणार आहे. त्यामुळे त्याला जोडून असणारे शेतकरी, अडते, हमाल, समितीचे कर्मचारी अशा सर्वच घटकांचे अपरिमित नुकसान होणार आहे. उद्या बरबाद व्हायचे नसेल तर आजच या दुरूस्त्यांना रस्त्यावर येऊन विरोध करा,” असे आवाहन ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी केले.
केंद्राच्या कायद्याच्या विरोधात भारत बंद नागरिक कृती समिती व अंगमेहनत कष्टकरी संघर्ष समिती यांच्या वतीने शुक्रवारी (दि. २७) राज्य कृषी पणन मंडळाच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. हमाल पंचायत, छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियन, तोलणार संघटना, पथारी व्यावसायिक पंचायत, शेतकरी कामगार पक्ष, लोकायत व अन्य संघटना आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
शेतकऱ्यांचे प्रतिक म्हणून आंदोलनात खुरप्याची प्रतिकृती होती. पिकांना किमान आधारभूत किंमत मिळाली पाहिजे, पिकांना हमी भाव मिळालाच पाहिजे अशा घोषणा देण्यात येत होत्या. डॉ. आढाव यांच्यासह समितीचे निमंत्रक नितिन पवार, संतोष नांगरे, गोरख मेंगडे, सागर आल्हाट, हनुमंत बहिरट, राजेंद्र चोरगे, बाळासाहेब मोरे, कल्याणी दुर्गा रवींद्र यांचीही भाषणे झाली. पणन मंडळाचे व्यवस्थापक अनिल पवार यांनी मागण्यांचे निवेदन स्विकारले.