खळद : विमानतळामुळे या परिसरातील सात गावे बाधित होणार असून, साधारण हजारो लोकांना विस्थापित व्हावे लागणार आहे. सरकारने काहीही पॅकेजेस जाहीर केले तरी बाधित शेतकऱ्यांचा विरोध कायम राहणार असल्याचे विमानतळविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे यांनी सांगितले .खानवडी येथे विमानतळ बाधित शेतकऱ्यांच्या विमानतळविरोधी संघर्ष समितीच्या वतीने ३० एप्रिल रोजी रात्री तातडीची बैठक घेण्यात आली. या वेळी झुरंगे बोलत होते. या वेळी पंचायत समितीच्या सदस्या सुनीता कोलते, संघर्ष समितीचे उपाध्यक्ष अमोल कामठे, सुनंदा झेंडे, माजी सरपंच रामदास होले, बाबा पंडोल, लक्ष्मण गायकवाड, अमोल टिळेकर, चंद्रशेखर मेमाणे, काका सावंत, विलास झेंडे, रामचंद्र कुंभारकर, विठ्ठल मेमाणे, नामदेव कुंभारकर, सतीश कुंभारकर आदी उपस्थित होते. या ठिकाणी आलेल्या शेतकऱ्यांनी घरी गेल्यानंतर आपल्या घरातील लोकांचा विचार घ्यावा. ज्यांना जमीन शासनाला द्यायची आहे त्यांना आमचा विरोध नाही. शेतकऱ्यांनी आपला निर्णय आपण स्वत: गुरुवारी कुंभारवळण येथे होणाऱ्या बैठकीत जाहीर करावा, असे दत्ता झुरंगे यांनी सांगितले. पारगाव-माळशिरस पाणी योजना ऐन उन्हाळ्यात बंद आहे. यामुळे लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी ही योजना चालू करण्यात लक्ष घातले तर लोकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. पण तसे न होता विमानतळाच्या माध्यमातून मात्र लोकांवर गदा आणण्याचे काम केले जात आहे, असे पंचायत समितीच्या सदस्या सुनीता कोलते यांनी सांगितले. रमेश बोरावके, संतोष हगवणे, जी. टी. पवार, माजी सरपंच रामदास होले आदींनी आपले विचार व्यक्त केले.जितेंद्र मेमाणे यांनी सूत्रसंचालन केले. महादेव टिळेकर यांनी आभार मानले.
विमानतळबाधित शेतकऱ्यांचा विरोध कायम
By admin | Published: May 03, 2017 1:52 AM