पुणे : कोरोना उपचारांसाठी भरमसाठ बिल आकारून रुग्णांची लूट करण्याच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांवरच गुन्हा दाखल करण्याचा आम आदमी पार्टीने (आप) निषेध केला आहे. सरकारी यंत्रणा काही करत नाही म्हणूनच आंदोलन करावे लागते, असे आपने म्हटले आहे.
नाशिकच्या आपचे पदाधिकारी जितेंद्र भावे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याच्या संदर्भाने राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत बोलत होते. ते म्हणाले की, पुण्यात ऑगस्ट २० पासून मनपाने तपासलेल्या १२८९ बिलांपैकी ९३७ बिलांत अधिक दर आकारले गेल्याचे आढळले. त्यात ४ कोटींची रक्कम वाढीव होती. पुण्यासारख्या सजग शहरात असे तर इतर शहरातील लुटीची कल्पनाच करवत नाही. याविरोधात आवाज उठवून आप काहीही गुन्हा करत नाही.
गुन्हा दाखल केला तरी ‘आप’ रुग्णालयांकडून होणाऱ्या लुटीच्या विरोधात आवाज उठवतच राहतील. फसवणूक होत असल्यास रुग्णाला तक्रार करण्यासाठी सरकारने राज्यस्तरीय हेल्पलाइन नंबर द्यावा, कोरोना संदर्भातील नियमांचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आप करत असल्याचे किर्दत म्हणाले. याची दखल न घेतल्यास आपच्या वतीने ऑपरेशन हॉस्पिटल मोहीम राबवण्याचा इशारा त्यांनी दिला.