सोमेश्वरनगर : निंबूत येथे आज पार पडलेल्या अवयवदान शिबिरामध्ये १ हजार १११ जणांनी अवयवदानासाठी अर्ज भरून देत मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प केला. या आगळ्यावेगळया उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. स्व. रमेशभैया काकडे मेडिकल फौंडेशनच्या वतीने अवयवदान संकल्प व जनजागृतीसाठी अवयवदान शिबिराचे आयोजन निंबूत येथे केले होते. या वेळी बी. जी. काकडे, लक्ष्मण गोफणे, डॉ. कांचन सावंत, अजय काकडे, योगेश ढमाळ, संकेत जगताप, नासीर इनामदार, संदीप सुतार, तुषार खलाटे, सुनंदा काकडे, रोहिणी काकडे, चतुरा काकडे, लक्ष्मीबाई लकडे याचबरोबर मोठ्या संख्येने महिला व तरुण उपस्थित होते. डॉ. कांचन सावंत म्हणाल्या, की एका व्यक्तीने दान केलेले अवयव ३५ जणांचे जीवन सुखकर बनवते. मृत्यूनंतर अवयव दान करायचे असल्यास त्या संदर्भात अगोदर अर्ज भरून देणे आवश्यक आहे. त्यानंतर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर अवयवदान करता येते. मात्र अशा व्यक्तीच्या मृत्यूनंतर संबधित विभागाला वेळीच कल्पना द्यावी. उशीर झाल्यास अवयव निकामी होतात. त्याचा कोणताही उपयोग होत नाही. निंबूत येथील सामाजिक कार्यकर्ते धैर्यशील काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते.(वार्ताहर)
१ हजार १११ जणांचा अवयवदानाचा संकल्प
By admin | Published: December 26, 2016 2:06 AM