अवसरी : आंबेगाव तालुक्यात सध्या लोककलाकारांची वर्दळ वाढली असून, अनेक प्रकारचे लोककलावंत आपली लोककला सादर करून धान्य आणि इतर रूपाने पैसे जमा करून उपजीविका भागवत आहेत. सरकारने लोककलाकारांच्या कलेची प्रशंसा करून त्यांना मानधन सुरू करावे, अशी मागणी लोककलाकारांनी केली आहे.
विविध गावांमध्ये पिंगळा यांचे आगमन झाले आहे. पिंगळा हातात कंदील घेऊन हातातील छोटे डमरू वाजून भिक्षा मागत आहे. पूर्वी पहाटेच्या वेळी येणारा पिंगळा दिवस उगवेपर्यंत भिक्षा मागी; परंतु चोरट्यांच्या आणि वाघाच्या भीतीने पहाटेच्या अंधारात बाहेर न पडता दिवस उजाडल्यानंतर सकाळी ९ वाजेपर्यंत तो भिक्षा मागत आहे. काठापूर बुद्रुक येथे या पिंगळ्यांचे आगमन झाले असून सिल्लोड तालुक्यातील (जि. औरंगाबाद) काका सोपान जाधव हे आपली कला दाखवून कपडे, साड्या व पैशाच्या रूपाने दान मागत असल्याचे दिसून येते. पूर्वापार चालत आलेली ही परंपरा या वृद्ध कलावंतांनी जिवंत ठेवली असून पुढील काळात ही परंपरा लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. कारण, या कलाकारांच्या पुढच्या पिढ्या या शिक्षण घेऊन इतर क्षेत्रांत कार्यरत झाले आहेत. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या काळात या लोककलावंतांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग शत्रुपक्षाची माहिती मिळविण्यासाठी झाला होता. परंतु, सरकारचे या लोककलेकडे दुर्लक्ष होत असून, शासनाने त्यांच्या लोककलांना आधार देण्यासाठी मानधन सुरू करण्याची मागणी केली आहे.