लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: आपले तीन पक्षाचे सरकार आहे, कोणाचा अवमान होईल असे वागू नका, असा सल्ला पक्ष कार्यकर्त्यांना देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांंनी जणू त्याचेच उदाहरण म्हणून शिवसेनेला वर्धापनदिनासाठी व राहुल गांधी यांंना वाढदिवसासाठी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादीचे हे कार्यालय पुणे शहराचे सांस्कृतिक व सर्व प्रकारचे व्यासपीठ व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी पवार यांच्या हस्ते झाले. खासदार वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे, सुनिल टिंगरे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, तसेच पक्षाचे आजीमाजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, पुण्यासाठी बरेच काही केले, बरेच काही करायचे आहे. पुण्यात रोजगार निर्माण व्हावा, यासाठी पुणे पिंपरी- चिंचवड यांचा पर्यटन विकास व्हावा म्हणून प्रयत्न सुरू आहेत. सत्ता आपली आहे, पण तीन पक्षाची आहे. मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम सुरू आहे. कोणी काही बोलले तरी त्यांना उत्तर देण्याच्या फंदात पडू नका. राज्याचे नेते बोलतील असे म्हणा.
पवार साहेब फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचाराने काम करतात. ते सर्वांचा मान ठेवतात, आपणही करायला हवा असा सल्ला देऊन पवार म्हणाले, कार्यालयाची पायरी चढताना आपले वर्तन पक्षाची हानी करणारे नाही ना याचा विचार करा. कार्यकर्त्यांनी मन लावून काम केले असते तर आत्ता दोन ऐवजी तीन आमदार असले असते. मतभेद, गटतट नकोत. चांगले काम करायचे याकडे लक्ष द्या.
पवार यांच्या हस्ते पक्षाला मदत करणाऱ्या गिरे बंधू व अन्य पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्वागत व प्रास्तविक केले. अंकुश काकडे यांनी सुत्रसंचालन केले. विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी आभार व्यक्त केले.
---------------
गर्दी पाहून जाणार होतो
आपणच नियमावली करतो व ती मोडतो. मी सकाळी ७ वाजता येऊन जाणार होतो, आत्ताही गर्दी पाहून तसाच जाणार होतो, पण कार्यकर्त्यांचा उत्साह मोडवत नाही असे सांगत पवार यांनी आपण कोरोनाचे नियम मोडले याची खंत वाटते आहे असे सांगितले.