पुणे : पावसाने राज्यात विश्रांती घेतली असून, आठवडाभर ही स्थिती राहणार आहे. मात्र, ऑगस्टच्या अखेरीस चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर, काही जिल्ह्यांमध्ये मात्र सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये सरासरीहून अधिक पाऊस झाला, तर मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये आहे.
सध्या हिंदी महासागर आणि प्रशांत महासागराचे पाण्याच्या पृष्ठभागाच्या तापमानाचा प्रभाव समान आहे. त्यामुळे ‘अल निनो’चा सध्या प्रभाव दिसून येत नाही. आयओडी पॉझिटिव्ह राहण्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या १९ तारखेपासून नैऋत्य मॉन्सूनचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. परिणामी ऑगस्टच्या शेवटी चांगल्या पावसाची शक्यता आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे. हिमालयाच्या पायथ्याकडे मॉन्सूनचा आस आहे. पावसासाठी पोषक प्रणालींच्या अभावामुळे राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारली आहे. मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे कायम असून, तो सीतामढी, किसानगंज ते मणिपूरपर्यंत सक्रिय झालेला आहे. तसेच दक्षिणेकडे कर्नाटकपासून कोमोरीन भागापर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. दरम्यान, राज्यात मॉन्सून कमजोर आहे, तरी तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहेत. अनेक भागांत मुख्यतः पावसाची उघडीप आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा भागात सरासरी पाऊस अपेक्षित
महाराष्ट्रात १८ ते २४ आणि २५ ते ३१ ऑगस्ट दरम्यान पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही भागात आणि शेजारील तसेच शेवटच्या आठवड्यात कोकण विभागातील काही भागात पाऊस होईल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा भागात सरासरी पाऊस अपेक्षित आहे. पण स्पष्टता नाही. - डॉ. कृष्णानंद होसळीकर, प्रमुख, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे
कुठे कमी, कुठे अधिक
सध्या नगर, सातारा, सांगली आणि जालना या जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. या आठवड्यात त्यात भर पडणे शक्य आहे. तर नांदेड, लातूर, पालघर, ठाणे, रायगड आणि यवतमाळ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. एकूणच हवामान बदलाने यावर्षी मॉन्सून प्रभावित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.