पुणे : गेल्या काही दिवसांपासून मध्य महाराष्ट्रात पावसाने चांगलाच जोर पकडला होता. तो आता ओसरणार आहे. मंगळवारपासून (६ ऑगस्ट) वरुणराजाला विश्रांती मिळणार आहे. सध्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. त्यादेखील दोन दिवसांत कमी होतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
विदर्भामध्ये मंगळवारी (६ ऑगस्ट) काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज असून, येलो अलर्ट जारी केला आहे, तर कोकणातील रत्नागिरी आणि रायगड तसेच सातारा आणि पुणे जिल्ह्यातही काही भागात जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे. मराठवाड्यामध्ये काही भागात हलक्या सरी कोसळणार आहेत, तर इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. खान्देशातही काही भागात हलक्या ते मध्यम पाऊस वगळता जोरदार पावसाची शक्यता नसल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासूनच्या संततधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे जवळपास भरली आहेत. बुधवारी (७ ऑगस्ट) कोकणामधील अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. संपूर्ण विदर्भालाही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे. तर खानदेशातही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
कुठे, कोणता अलर्ट?
पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे. खान्देश, मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर, विदर्भात काही जिल्ह्यांत ऑरेंज, तर अनेक भागांत येलो अलर्ट आहे.
राज्यातील सोमवारचा पाऊस
पुणे : ०.३ मिमी
कोल्हापूर : ३ मिमीमहाबळेश्वर : २१ मिमी
नाशिक : ०.९ मिमीसांगली : ०.३ मिमी
सातारा : ३ मिमीसोलापूर : ०.४ मिमी
मुंबई : २ मिमीरत्नागिरी : ६ मिमी
नागपूर : ०.३ मिमी