धनकवडी : यशस्विनी बचत गटाच्या माध्यमातून बचत बाजाराचे आयोजन करण्यात आले.अश्विनी भागवत यांनी धनकवडी येथील लोकनेते शरदचंद्र पवार बहुउद्देशीय भवनामध्ये यशस्विनी बचत बाजाराचे आयोजन केले होते.यशस्विनी सामाजिक अभियानाच्या माध्यमातून आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून दिनांक १७ डिसेंबर ते २५ डिसेंबरपर्यंत यशस्विनी सामाजिक अभियानांतर्गत चालू असलेल्या या बचत बाजारात लावण्यात आलेल्या शंभर स्टाँलमधून लाखोंची उलाढाल झाली. दरम्यान, खासदार सुळे यांनी या बचत बाजाराला भेट देत महिलांशी संवाद साधला. या वेळी महिलांनी खासदार सुळे यांना आपण स्वत: उत्पादित केलेल्या वस्तूंंची माहिती देत फोटो घेतले. महिलांचा आनंद आणि उत्साह पाहून खासदार सुळे यांनाही महिलांसोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरता आली नाही. नऊ दिवस सुरू असलेल्या या बचत बाजारात लाखोंची उलाढाल झाली. नागरिकांनी वेगवेगळ्या अशा लज्जतदार पदार्थांचा आस्वाद घेताला तर विविध प्रकारचे लोणचे, पापड, चटण्या, उकडीचे मोदक असे पटकन तयार होणारे खाद्यपदार्थ आणि वेगवेगळ्या चकल्या, चिवडा, बाकरवडी, आवळा, सोप, सुपारी आणि ड्रायफ्रूट मिठाई अशा खमंग आणि लज्जतदार पदार्थांच्या खरेदीचा आनंद घेतला.निश्चित फायदा : बचत गटांना प्रोत्साहनस्थायी समितीचे मा. अध्यक्ष नगरसेवक विशाल तांबे म्हणाले की, महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक गरजा लक्षात घेऊन सूक्ष्म, मध्यम उद्योगांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना आजच्या स्पर्धात्मक युगात यशस्वीपणे टिकण्यासाठी बचत बाजार, खाद्य जत्रा, भीमथडी यात्रा यांसारख्या बचत बाजाराचा निश्चितच फायदा होईल.
यशस्विनी बचत बाजाराला प्रतिसाद , खासदार सुप्रिया सुळे यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 2:02 AM