पुणे : राज्यभरात वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्य विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग व विभागीय प्रत्यारोपण समितीतर्फे राबविण्यात आलेल्या अवयवदान अभियानाचा रॅलीच्या माध्यमातून शुभारंभ करण्यात आला. या वेळी सहभागींनी अवयवदानाची शपथ घेतली.शहराच्या ७ भागांमधून काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये बी. जे. मेडिकल विद्यालयातील डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, विविध वैद्यकीय संघटनांचे पदाधिकारी डॉक्टर, महाविद्यालयीन तरुण, स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळांचे कार्यकर्ते व नागरिकांनी सहभाग घेत मोठा प्रतिसाद दिला.माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेते राहुल सोलापूरकर, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, महापौर प्रशांत जगताप, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, बिशप थॉमस डाबरे, रितू छाब्रिया आदी उपस्थित होते. अण्णा हजारे यांनी रॅलीतील सहभागींना मार्गदर्शन करताना सांगितले, की अवयवदान चळवळ वाढीला लागावी यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा. मरेपर्यंत आणि मेल्यावरही देशाच्या सेवेत राहीन यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध असायला हवे. या वेळी अण्णांचा अवयवदानाचा फॉर्म भरून त्यांना अवयवदात्याचे कार्डही डॉ. चंदनवाले यांच्या हस्ते देण्यात आले. डॉ. चंदनवाले म्हणाले, की मानवाचे शरीर नश्वर असल्याचे म्हटले जाते,मात्र अवयवदान केल्यास ते अमर राहते, असा संदेश डॉ. अजय चंदनवाले यांनी दिला. ते म्हणाले, या माध्यमातून मृत्यूनंतरही आपण दुसऱ्यांच्या शरीरात जिवंत राहू शकतो.(प्रतिनिधी)
अवयवदान रॅलीला प्रतिसाद
By admin | Published: August 31, 2016 1:30 AM