पुणे : जगभरात कोरोनाच्या साथीने थैमान घातले आहे. जगभरात हजारो नागरिक जीवानशी जात आहेत तर लाखोंना त्याची लागण झाली आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून जेजुरी येथे दीपोत्सव करण्यात आला. महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरी गडावर देवसंस्थान च्या वतीने 1150 दिवे आणि 9 समया प्रज्वलित करण्यात आल्या होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जेजुरीत घरोघरी रविवारी रात्री नऊला लाईट नऊ मिनिटांसाठी बंद केले होते. यावेळी नागरिकांकडून बाल्कनी, ओट्यावर, दरवाजात, खिडकीत दिवे लावण्यात आले होते. लॉकडाऊन होण्यापूर्वी देखील पंतप्रधान यांच्या टाळ्या, थाळ्या वाजविण्याच्या आवाहनाला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. सर्वसामान्य नागरिकांसाठी लढणाऱ्या पोलीस, डॉक्टर, पालिका अधिकारी कर्मचारी यांचा उत्साह वाढविण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. यानंतर लॉकडाऊनच्या काळात नागरिकांचे मनोबल उंचावण्यासाठी तसेच त्यांच्यात सकारात्मकता निर्माण करण्यासाठी दिवे लावा या आवाहनाला देखील तितकाच सकारात्मक व उत्साहपूर्ण प्रतिसाद दिल्याचे रविवारी रात्री दिसून आले.
देवस्थानचे विश्वस्त शिवराज झगडे, पंकज निकुडे मुख्य कार्यकारी अधिकारी व कर्मचारी यांनीच हे दिवे प्रज्वलित केले होते. रात्री 9 वाजताची मल्हारी मार्तंडाची आरती महापूजा झाल्यानंतर हे दिवे प्रज्वलित करण्यात आले. जगाला कोरोनापासून मुक्ती लाभू दे अशी प्रार्थना ही करण्यात आली शहरात ही संपूर्ण लाईट बंद करून घराघरात दिवे लावण्यात आले होते. अनेकांनी फटाके उडवले तर काहींनी कोरोना गो'च्या घोषणा दिल्या