पुणे : दोन तरुणी बालगंधर्व पुलावरून जात असतात... दोन तरुण त्यांची छेड काढतात... अशीच घटना कोथरूड परिसरात घडते... दोन्ही ठिकाणांवरील तरुणी मदतीसाठी पोलिसांच्या ‘प्रतिसाद अॅप’द्वारे मदत मागतात... एका ठिकाणी अवघ्या पाच मिनिटांत पोलीस पोहोचतात... तर दुसऱ्या ठिकाणी हद्दीच्या वादामुळे पोलीस पोहोचायला लागतो तब्बल अर्धा तास... दोन्ही ठिकाणी मदत पोहोचल्यानंतर पोलिसांचा प्रतिसाद मात्र सकारात्मक असल्याचे ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले. पुणे पोलिसांनी एका खासगी संस्थेच्या मदतीने ‘प्रतिसाद’ हे अॅप सुरू केले आहे. महिला आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुरू करण्यात आलेल्या या अॅपद्वारे संकटकाळात मदत मागवणे अधिक सोपे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. स्मार्टफोन असल्यास केवळ एका ‘क्लिक’वर मदत मागवणे सोपे व्हावे, याकरिता हे अॅप सुरू करण्यात आले. या अॅपची उपयुक्तता आणि पोलिसांची तत्परता तपासण्यासाठी ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी स्टिंग आॅपरेशन केले. स्वत:च्या मोबाईलवर अॅप डाऊनलोड केले. पोलिसांकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद आणि त्यांची वेळेत पोहोचलेली मदत ही विशेष बाब आहे. या अॅपमध्ये सुधारणेला बराच वाव असला तरी हे अॅप उपयुक्त असल्याचे समोर आले. पोलीस अजूनही हद्दीच्या वादातनियंत्रण कक्षाकडून तीन किलोमीटरच्या आतमध्ये असलेल्या कोथरुड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना माहिती कळवण्यात आली होती. मात्र, या पोलिसांनी घटनास्थळी पोहोचण्याऐवजी आपली हद्द नसल्याचे कारण देत अलंकार पोलिसांना उशिरा माहिती दिली. अलंकार पोलिसांना माहिती मिळताच त्यांचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी धावले. यामध्ये अर्धा तास गेला. संकटकाळात पोलिसांकडून घातला जाणारा हद्दीचा घोळ ‘अॅप’ सेवेमध्येही कायम आहे. कसे काम करते अॅप? पुणे पोलिसांनी महिला आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुरू केलेल्या ‘प्रतिसाद’ अॅपला नागरिकांच्याच प्रतिसादाची प्रतीक्षा आहे. पुणे, पुणे ग्रामीण, कोल्हापूर आणि सोलापूर या चार जिल्ह्यांमध्ये ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी कंपनीने सर्व विभागीय कार्यालयांमध्ये पोलिसांना प्रशिक्षणही दिले आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षामध्ये ‘वुमन हेल्पलाइन’ सुरू करण्यात आलेली आहे. या कक्षामध्ये प्रतिसाद अॅपचे संचलन केले जाते. त्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. संकटकाळी नागरिक या अॅपमधील ‘इमरजन्सी’ बटण दाबून मदत मागवू शकतात. हे बटण दाबताच पोलीस नियंत्रण कक्षातील संगणकावर अलर्ट जातो. हा अलर्ट तत्काळ मदत मागणाऱ्या व्यक्तीपासून तीन किलोमीटर अंतराच्या आतमध्ये असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्याला दिला जातो. त्याला ‘असाईन’ करणे असा शब्दप्रयोग वापरण्यात येतो. त्यांच्या मोबाईलवर तत्काळ मदत पोहोचवण्यासाठी अलर्ट दिला जातो. त्याच्या रिक्वेस्ट फोल्डरमध्ये हा अलर्ट जातो. त्याच वेळी मदत मागणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवर त्यांची तक्रार नोंद झाल्याचा मेसेज दिला जातो. त्या मेसेजमध्ये तक्रारीचा ‘आयडी’ क्रमांक , त्यांच्या जवळच्या भागात असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोबाईल क्रमांक दिला जातो. तसेच मदत कुठंपर्यंत आली आहे, याचीही माहिती सतत पुरवली जात असते. दरम्यान, त्या व्यक्तीला पोलिसांचे मदतीसाठीचे फोनही सुरू होतात. पोलिसांनी आतापर्यंत त्यांच्याकडे अॅपद्वारे आलेल्या ३२ तक्रारींचे निराकरण केलेले आहे. पोलीस आयुक्तालयामधील नियंत्रण कक्षामधून सहायक आयुक्त राम मांडुरके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेहाना शेख, पोलीस कर्मचारी आश्लेषा माने, माधुरी अनघुले, मीरा रंधवे या कर्मचारी काम सांभाळत आहेत. प्रसंग एकस्थळ : महर्षी वि. रा. शिंदे पूलवेळ : दुपारी ४:३०दोन तरुणी प्रतिसाद अॅपवरून मदतीसाठी इमरजन्सी बटण दाबतात. अवघ्या काही मिनिटांतच मोबाईलवर रिक्वेस्ट सबमिट झाल्याचा मेसेज मिळाला. पोलीस नियंत्रण कक्षावरून महिला पोलिसाने फोन करून तरुणींना ‘तुम्ही कोठे आहात, कोणी त्रास दिलाय’ याची माहिती घेत ‘मार्शल’ मदतीसाठी पोहोचत असल्याचे कळवत धीर दिला. त्यानंतर काही मिनिटांतच पोलीस कर्मचाऱ्यांचा पुन्हा फोन आला. त्या थांबलेल्या जागेचा पत्ता विचारत पोलीस पुलावर पोहोचले. महिला प्रतिनिधींकडे नेमके काय घडले, याची विचारणा केली. त्या वेळी छेडछाडीचा प्रकार घडल्याचे तरुणींनी सांगितले. पोलिसांनी तक्रार करण्यासंदर्भात सुचवले. प्रतिनिधींनी घरी विचारतो, असे सांगताच विचार करून सांगा, असे म्हणत पोलीस धीर देऊन परत गेले.प्रसंग दोनठिकाण : कोथरूड परिसरातील सिनेमागृहवेळ : ४ वाजून ३० मि.तरुणींनी अॅपमधील इमरजन्सी बटण दाबले. त्यानंतर तब्बल अर्ध्या तासाने ५ वाजून ०३ मिनिटांनी अलंकार पोलीस चौकीतील पोलिसांचा फोन आला. ते म्हणाले, ‘‘मॅडम तुम्ही कुठे आहात. प्रतिनिधींनी त्यांना पत्ता सांगितला. पत्ता सांगितल्यानंतर परत ५ वा. ८ मिनिटांनी दुसरा फोन आला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर प्रतिनिधींकडे चौकशी केली. त्यांच्यातील संवाद तरुणी : ४ मुले आमचा पाठलाग करीत होती. आम्ही रस्त्यावरील एक-दोन जणांकडे मदत मागूनही त्याचा उपयोग झाला नाही. आम्ही घाबरलेल्या अवस्थेमध्ये एका सोसायटीच्या गल्लीमध्ये शिरलो. पोलिस कॉन्स्टेबल : ती मुले कधीपासून तुमचा पाठलाग करीत आहेत. लोकमत प्रतिनिधी : ४ वाजल्यापासून मुले पाठलाग करीत होती.कॉन्स्टेबल : तुम्ही कोठे राहता, ती मुले कशी दिसत होती व त्या मुलांच्या गाडीचा नंबर तुम्ही पाहिलात का?प्रतिनिधी : कॉलेजमध्ये जाणारी मध्यमवर्गीय मुले दिसत होती. आम्ही घाबरलो होतो, म्हणून त्यांचा नंबर घेण्याचे सुचले नाही. कॉन्स्ेटबल : तुम्ही काही घाबरू नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत. कधीही संकटात सापडलात, की प्रथम १०० नंबरला फोन करा. तुम्हाला तत्पर मदत मिळू शकते. आम्ही तुमच्या मदतीसाठी आधीच आलो असतो. परंतु आम्हाला माहितीच उशिरा मिळाली असल्यामुळे तुमची मदत करण्यासाठी उशीर झाला. -----------टीम लोकमत : प्राची मानकर, माधुरी सरवणकर, प्रियंका लोंढे, बेनझीर जमादाऱ
संकटकाळी पोलिसांचा ‘प्रतिसाद’
By admin | Published: March 27, 2016 3:00 AM