पुणे : ड्रेनेजचे काम चांगले झाले होते; मात्र पावसामुळे रस्ता खचला व झाकण वर आले, असा अहवाल देत पालिका प्रशासनाने तीनहत्ती चौकात बुधवारी झालेल्या अपघाताची जबाबदारी झटकली आहे. दरम्यान, महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्यासह पालिकेच्या अन्य काही अधिकाऱ्यांनी सकाळी घटनास्थळी भेट घेत पाहणी केली. आयुक्तांच्या अहवालाचा अभ्यास करून, नंतर यावर अधिक बोलू, असे धनकवडे यांनी सांगितले.रस्त्यावरच्या ड्रेनेजचे झाकण वर आल्याने, त्याला मोटारसायकल धडकून श्रावण चौधरी या युवकाचा बुधवारी जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सजग नागरिक मंचच्या वतीने यासंदर्भात पालिका आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी झाल्याने, या अपघाताला वेगळे वळण मिळाले. पालिकेची रस्त्याची कामे अत्यंत संथगतीने सुरू असून, शहरातील अनेक रस्ते त्यामुळे अपघातप्रवण झाले आहेत. त्याचा सगळा संताप ‘सोशल मीडिया’तून; तसेच प्रसार माध्यमातून व्यक्त होऊ लागल्याने आयुक्त कुणाल कुमार यांना या अपघाताची दखल घ्यावी लागली. ड्रेनेजच्या कामाची चौकशी करण्याचे व कोणी दोषी आढळले, तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते.मात्र, त्यानंतर अहवाल कोणी सादर करायचा, यावर प्रशासनाने वेळ घेतला. अखेरीस ड्रेनेज विभागाने सकाळी पाहणी करून आपला अहवाल तयार केला व तो आयुक्तांना सादर केला. त्यात त्यांनी अवकाळी पावसाचा आधार घेतला आहे. ड्रेनेजचे काम चांगलेच झाले होते, त्यात काहीच अडचण नव्हती; मात्र अचानक पाऊस आला, काम ओले होते, त्यामुळे आजूबाजूचा रस्ता खचून ड्रेनेजचे झाकण वर आले, असे त्यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. दुसरीकडे रस्ता व्यवस्थित व विनाअडथळा ठेवण्याची जबाबदारी असलेल्या पथ विभागाने तर आम्हाला अहवाल सादर करण्याचे आदेशच नव्हते, असे सांगत यातून अंग काढून घेतले आहे. (प्रतिनिधी)
पालिकेने झटकली अपघाताची जबाबदारी
By admin | Published: November 27, 2015 1:45 AM