लोकमत न्यूज नेटवर्क
नम्रता फडणीस
पुणे : ‘ते’ खरंतर जीवरक्षक आहेत . कॅनॉल किंवा नदीमध्ये कुणी उडी मारली अथवा तोल जाऊन पडले तर त्यांचा जीव वाचवतात. मात्र, कोरोना काळात संगमवाडी घाटावर हे जीवरक्षक स्वत:हून पुढाकार घेत बोटीद्वारे अस्थी विसर्जन करण्यासाठी लोकांची मदत करत आहेत. अस्थी कलशाची पूजा कशी करायची? वगैरेची सर्व माहिती गुरुजींकडून शिकून घेतली आहे. कोरोना काळात दिवसाला 10 ते 12 अस्थींचे विसर्जन करण्याचे काम ते पार पाडत आहेत. यासाठी कोणताही मोबदला न घेता सामाजिक बांधिलकीतून त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे, ही त्यातील उल्लेखनीय बाब आहे.
कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर स्मशानभूमीत त्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातात आणि तिसऱ्या दिवशी नातेवाईक संबंधित व्यक्तीच्या अस्थी सावडायला येतात. त्यानंतर त्यांना अस्थी कलश दिला जातो. त्या अस्थींचे दहा दिवसानंतर विसर्जन करावे लागते. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता आळंदीमधील पोलिसांनी अस्थी विसर्जनास येण्यास मज्जाव केला आहे. आळंदीसह शहरातील सर्व अस्थी विसर्जनाची ठिकाणे देखील बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे आता संगमवाडी घाट हेच अस्थी विसर्जनाचे एकमेव ठिकाण झाले आहे. त्याची जबाबदारी या जीवरक्षकांनी उचलली आहे.
बापू शंकर तिकोने आणि जगन शंकर तिकोने सकाळी 7 ते सायंकाळी 7 असे बारा तास ते हे काम करीत आहेत. ‘लोकमत’शी बोलताना बापू शंकर तिकोने म्हणाले, कोरोना काळात महापालिकेकडून घाटावरच्या साफसफाईची कामे केली जातात. मात्र, आम्ही ही कामे करीत नाही असे महापालिका म्हणते, संगमवाडी घाटावर या काळात आमच्याशिवाय कुणीही हे काम करणार नाही. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून आम्ही हे काम करीत आहोत. एखादा पॉझिटिव्ह व्यक्ती देखील अस्थी विसर्जनासाठी येऊ शकतो. ही शक्यता गृहीत धरूनच स्वत:ची काळजी घेऊनच काम करावे लागते. मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग या गोष्टी आम्ही कटाक्षाने पाळतो. बोटीत केवळ दोनच व्यक्तींना प्रवेश दिला जातो. त्यांच्यात आणि आमच्यात 3 फुटाचे अंतर राखले जाते. आम्ही ही सेवा आनंदाने करतो. त्याबदल्यात कोणताही मोबदला घेत नाही.
------------------------------------------------------------------
आळंदीच्या पोलिसांनी अस्थी विसर्जन करण्यासाठी येण्यास लोकांना बंदी घातली आहे. तुळापूर, वढूला देखील जाऊ दिले जात नाही. गेल्या महिन्यात माझ्या आईचे निधन झाले. मग, मी संगमवाडीला गेलो. तिथे गरीब कुटुंबातील चार नावाडी अस्थी विसर्जनासाठी लोकांची मदत करताना दिसले. जे कुणी अस्थी विसर्जन करण्यासाठी येतील. त्यांना स्वत:ची बोट घेऊन ते नदीत जातात आणि अस्थी विसर्जन करवून आणतात. याकरिता ते लोकांकडून कोणताही मोबदला घेत नाहीत. कुणी आपणहून दिले तरच ते पैसे घेतात. पण आपणहून पैसे मागत नाहीत- डॉ. मिलिंद भोई, भोई प्रतिष्ठान
---------------------------------------------------------------------------------------------------------