वालचंदनगर : लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा, कोवळ्या मनावर जसे संस्कार द्यावेत; तसेच संस्कार लहान मुले अंगीकारतात. वालचंदनगर परिसरात आलेल्या अनेक मेंढपाळांची कोवळी मुले लहान वयातच आपल्या आईवडिलांचा संसाराचा महत्त्वाचा भाग ठरत आहेत. असाच ५ वर्षांचा शुभम तुकाराम ठोंबरेही आईवडिलांच्या संसाराचे ओझे घोड्यावर मांडून रानावनात हातात दोरी धरून घोड्यांना वाट दाखवत आहे.
वालचंदनगर, ता. इंदापूर येथे परजिल्ह्यातील असंख्य मेंढपाळ दाखल झालेले आहेत. रानावनात उघड्यावर पाले ठोकून ऊन, वारा पावसापासून सुरक्षितता मिळवून संसार थाटला आहे. या कुटुंबात छोटी छोटी मुले आपल्या आईवडिलांना मदतीसाठी धावताना दिसतात. मेंढ्यांच्या रक्षणासाठी हातात काठी घेऊन हुंदडत असताना दिसतात. शाळा, पाटी, पेन्सिल याचा मुलांना कसलाच गुंज नाही; परंतु शेकडो लहानशी मुले आपल्या कुटुंबाचा एक खंबीर सदस्य असल्याची जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत.वडील मेंढ्याचा कळप सांभाळण्यात मग्न असतात. मात्र, शुभमसारखी अनेक लहान मुले आईवडिलांच्या संसाराचे गाठोडे घोड्यावर मांडून कोंबडे,कुत्रे,मेंढ्याचे कोकरू सोबत घेऊन घोड्याची लगाम हातात धरून कुटुंबाला दिशा दाखवण्याचे काम करतात. कुटुंबाचे ऋण कसे फेडावे हा आदर्श आजच्या तरुण पिढीला दाखवित आहेत.