कोरेगाव भीमा: शंभूछत्रपतींच्या आशीर्वादाने श्रीक्षेत्र वढू बुद्रूक (ता. शिरुर) येथील सर्व समाजातील घटकांना न्याय देत वेगवेगळ्या आडनावांच्या बांधवांना एकत्र घेत जनतेच्या चौकाररुपी मिळालेल्या कौलामुळे यापुढे जबाबदारीत अधिक भर पडली आहे. यापुढील काळात शंभूछत्रपतींच्या समाधिस्थळाबरोबरच गावचा आधुनिक विकास करण्यावर भर देणार असल्याचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांनी सांगितले.
शंभूराजांचे समाधिस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता.शिरूर) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत चार जागा बिनविरोध निवडून आल्या असून यात श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलला तीन, तर श्री उदोबा ग्रामविकास पॅनेलला एक जागा मिळाली होती. त्यानंतर नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत श्री उदोबा ग्रामविकास पॅनेलला आठ, तर श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलला एकाच जागेवर विजय संपादित करता आला.
प्रफुल्ल शिवले यांनी सांगितले की, शंभूछत्रपतींचे समाधिस्थळ असलेले व श्री उदोबाची पांढरी असलेल्या श्रीक्षेत्र वढू बुद्रूकच्या ग्रामपंचायतीत केलेल्या पारदर्शक कामाच्या जोरावर सलग चारवेळा जनतेने श्री उदोबा ग्रामविकास पॅनेलच्या बाजूने कौल दिला आहे. यामुळे यापुढे अधिक जबाबदारीने काम करावे लागणार असून शंभूछत्रपतींचे समाधिस्थळ व गावच्या सर्वांगीण विकासावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चौकट :
शिवले बंधूंची एकत्र निवडणूक
दहा वर्षांपूर्वी प्रफुल्ल शिवले व अंकुश शिवले यांनी एकत्र निवडणूक लढवली व एकाच कालावधीत दोघेही सरपंच झाले होते. त्यानंतर यावर्षी झालेल्या निवडणुकीतही प्रफुल्ल शिवले यांची पत्नी अंजली शिवले व अंकुश शिवले यांच्या पत्नी सारिका शिवले याही निवडून आल्याने त्याही या कालावधीत सरपंच होणार का? याची चर्चा वढूत रंगू लागली आहे.
२१कोरेगाव भीमा