"संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी अजित पवारांवर, ते सक्षमपणे काम करतात..." रोहित पवारांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 11:57 IST2024-01-12T11:55:57+5:302024-01-12T11:57:30+5:30
व्हीएसआयमधील कार्यक्रमापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते...

"संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी अजित पवारांवर, ते सक्षमपणे काम करतात..." रोहित पवारांचा टोला
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काम करीत नाहीत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकीयदृष्ट्या कामात व्यग्र आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या कामाची जबाबदारी ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खांद्यावर आहे. अजित पवार हे अधिक सक्षमपणे काम करतात, असा टोला राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहित पवार यांनी लगावला.
व्हीएसआयमधील कार्यक्रमापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. अजित पवार यांनी व्हीएसआयला येण्याचे टाळले, यावर रोहित पवार यांनी वरील भाष्य केले. ‘आम्ही बोललो की ‘बच्चा है’ असे म्हटले जाते. मात्र याच वयात शरद पवार मुख्यमंत्री झाले होते. ६० ते ७० या वयोगटातील नेत्यांना मंत्रिपदासाठी त्यांचे वय योग्य वाटते अन् बाकी मुलामुलींचे वय अयोग्य वाटते, असेही राेहित पवार म्हणाले.
काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी अजित पवारांवर टीका करताना स्वत:च्या कारखान्यावर पडलेल्या धाडीवरून आपण घाबरत नसल्याचे नमूद केले होते. त्या वेळी रोहित पवारांच्या आरोपाला उत्तर देणे आपल्या दृष्टीने महत्त्वाचे नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले होते. गुरुवारी रोहित पवार यांच्याकडून पुन्हा अजित पवारांवर टीका करण्यात आली.