पुणे : पुणे जिल्ह्यात लँड माफिया, वाळू माफिया, माथाडी माफिया तसेच सराईत गुन्हेगार असलेल्या ११० गुंडांच्या टोळ्यांची पोलिसांनी यादी केली असून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोका, एमपीडीए अॅक्ट तसेच तडीपारी सारखी कठोर कारवाई करण्यात येणार आहे़. दुसऱ्यांदा विनयभंग करणारा आढळल्यास त्याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले़. बारामतीमधील झारगडवाडी येथील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनीने रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून विषप्राशन करुन आत्महत्या केली़. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी निर्भया पथकाची संख्या ८ वरुन १६ इतकी दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे़. पाटील म्हणाले, यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत जिल्ह्यातील ५ हजार ६६० हॉटस्पॉट निश्चित केले आहेत़. उपविभागामध्ये प्रत्येकी एक समुपदेशन टिममध्ये वकील, डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते , समाजसेवक यांची निवड केले आहे़. प्रत्येक शाळा, कॉलेजमध्ये जाऊन पोलीस व कराटे प्रशिक्षक मुलींना सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण दिले आहे़. असे ८६८ कार्यक्रम घेण्यात आले आहेत़. शाळा, कॉलेजमधील २ विद्यार्थीनींची निर्भया सखी म्हणून निवड केली आहे़. निर्भया पथकाद्वारे केलेल्या कारवाईत छेडछाड करणारे युवक व त्यांच्या पालकांना बोलावून त्यांचे माहिती दिली जाते़. त्याचे कॉन्सिलिंग केले जाते़ त्यानंतरही तो छेडछाड करताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते़, असे २२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़. आता दोनपेक्षा अधिक विनयभंगाचे गुन्हे दाखल झाल्यास त्यांना तडीपार करण्यात येणार आहे़. बारामती, पौड, खेड या ठिकाणी दामिनी पथकांची संख्या दुप्पट करणार आहे़. महत्वाच्या ८ ठिकाणी सिक्रेट सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत़. त्याची संख्या २४ करण्यात आली आहे़. प्रत्येक गावात महिला दक्षता समितीच्या सदस्यांमध्ये वाढ करुन ती १०० करण्यात आली आहे़. पोलीस काका पोलीस काकी योजना शाळांमध्ये सुरु केली असून त्यात पोलीस ठाण्यातील एका महिला कर्मचाऱ्याचा मोबाईल क्रमांक सर्व मुलींना देण्यात आला आहे़.........................बारामतीमध्ये गणेशोत्सवात सव्वाशे सीसीटीव्ही बसविण्यात येत असून मंडळांनी डॉल्बीऐवजी सीसीटीव्ही बसवावेत असे आवाहन करण्यात आले आहे़सर्व पोलीस ठाण्यांमधील गुंडा रजिस्टार अद्यायवत करण्यात येत आहे़जिल्ह्यातील नगरपालिकांमधील वाहतूक नियंत्रणासाठी ट्रॉफिक वॉर्डनची नेमणूक करण्याच्या सूचना संबंधित नगरपालिकांना केल्या आहेत़ जिल्ह्यातील ५ महामार्गांवरील अपघात प्रवण क्षेत्रात सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत़ - संदीप पाटील, पुणे जिल्हा ग्रामीण अधिक्षक
जिल्ह्यातील ११० गुन्हेगारी टोळ्यांवर नियंत्रण आणणार : संदीप पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 8:48 PM
बारामतीमधील झारगडवाडी येथील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनीने रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून विषप्राशन करुन आत्महत्या केली़.
ठळक मुद्देदोनपेक्षा अधिक वेळा विनयभंग करणारे होणार तडीपार