पुणे : सोमवार पासून एसटी सेवा बंद असल्याने राज्य परिवहन महामंडळाने प्रत्येक आगारात असलेले कर्मचाऱ्यासाठीचे विश्रांती कक्ष बंद करण्यात येत आहे. पुणे विभागात देखील याची अंमलबजावणी सुरु असून गुरुवारी सकाळी शिवाजीनगर डेपोतील विश्रांती कक्ष बंद करण्यात आला. यावेळी कक्षात कर्मचाऱ्यांचे असलेले सामान बाहेर काढून ठेवण्यांत आले. यावेळी महिला कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले. डेपोत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी आम्ही खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले.
पुणे विभागातील १३ हि डेपोतील विश्रांती कक्ष बंद करण्याचे काम सुरु होते. गुरुवारी शिवाजीनगर चा डेपो हा शेवटचा डेपो ठरला. आता पुणे विभागातील सर्व डेपोतील विश्रांती कक्ष बंद झाले आहे. शिवाजी नगर येथल्या आगारात जवळपास ४० ते ५० कर्मचाऱ्यांचे सामानाच्या पेट्या बाहेर काढण्यात आल्या. पेट्या बाहेर काढल्यानंतर कर्मचाऱ्यांनी ते पेट्या आंदोलनच्या ठिकाणी ठेवून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी कर्मचाऱ्यांची मोठी संख्या होती.