पुणे : शहरातील कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्यामुळे पालिकेने सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिक, व्यापारी आस्थापनांविरुद्ध कारवाईला सुरुवात केली आहे. सुरक्षा नियम धाब्यावर बसवित पालिकेच्या सुचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या खानावळ चालकाला पाच हजारांचा दंड करण्यात आला असून ही खानावळ सील करण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त आशिष महाडदळकर यांनी दिली.
पालिकेच्या कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. क्षेत्रीय कार्यालयाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सुनिल मोहिते, आरोग्य निरीक्षक रविराज बेंद्रे, मोकादम रविंद्र कांबळे हे हद्दीमध्ये मास्क, सुरक्षित अंतर, सॅनिटायझर, थर्मल मशीन, व्हिजीटर नोंदवही याची तपासणी करण्यात येत होती. ही तपासणी सुरु असताना सदाशिव पेठेतील स्वप्निल खानावळ मेसमध्ये हे पथक तपासणीसाठी गेले.
तपासणीदरम्यान या खानावळीत सुरक्षित अंतराचा फज्जा उडाल्याचे तसेच सॅनिटायझर ठेवलेले नाही, मास्क परिधान केले नाहीत अशी परिस्थिती दिसून आली. त्यामुळे या खानावळ मालकाला पाच हजारांचा दंड करण्यात आला असून खानावळ सील करण्यात आली आहे.