नीरा : पुरंदर तालुक्यातील नीरा शहरातील पालखीमार्गाची चाळण होऊन मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना या पालखीमार्गावरून वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत असून, खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याने सासवड आणि खंडाळा उपविभागाने हद्दीचा वाद निर्माण करून, नीरेतील शिवाजी चौकापासून नीरा नदीपुलापर्यंतचा अंदाजे एक किमीचा रस्तादुरुस्ती करण्यास गेल्या काही महिन्यांपासून टाळाटाळ चालविली आहे. शासनाने काही वर्षांपूर्वी नीरा - लोणंद (ता. खंडाळा) हा पालखीमार्ग बीओटी तत्त्वावर एका खासगी कंपनीला दिला होता. संबंधित खासगी कंपनीकडून नीरा नदीच्या पैलतीरावर सातारा जिल्ह्याच्या हद्दीत पाडेगाव येथे टोलवसुली केली जात होती. त्यामुळे संबंधित कंपनीकडून काही वर्षे या पालखीमार्गाची देखभाल-दुरुस्ती केली जात होती. परंतु, मध्यंतरी आघाडी सरकारने राज्यातील ४४ टोलनाके बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या ४४ टोलनाक्यांमध्ये पाडेगाव येथील टोलनाक्याचा समावेश होता. नोव्हेंबर महिन्यात संबंधित टोल कंपनीकडून नीरा-लोणंद या पालखी मार्गाचे नव्याने नूतनीकरण करण्यात येणार होते. नीरा चौकापासून ते नदी पुलापर्यंतच्या पुणे-पंढरपूर या पालखी मार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. या पालखीमार्गाच्या दुरुस्तीसाठी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने ‘रास्ता रोको’ आंदोलन केले होते. मात्र, या वेळी बांधकाम खात्याचे सासवड उपविभागाचे उपअभियंता डी. जे. पाटील यांनी संबंधित राष्ट्रवादीच्या आंदोलकांना आठ दिवसांमध्ये तातडीने पालखीमार्गाची बांधकाम खात्याकडून दुरुस्ती करण्यात येईल, अशी ग्वाही दिली होती. आंदोलकांना ग्वाही दिल्यानंतर बांधकाम खात्याच्या संबंधित अधिकऱ्यांनी नुकताच पदभार स्वीकारल्याचा बहाणा सांगून आता नव्याने हद्दीचा वाद निर्माण केला आहे. सासवडच्या बांधकाम खात्याचे अधिकारी खंडाळा हद्दीचा वाद काढून जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत.
हद्दीच्या वादात अडकली पालखीमार्गाची दुरुस्ती
By admin | Published: November 22, 2014 12:16 AM