पुणे : पुण्यात ज्ञानमंदिरात विद्यार्थ्यांच्या जीवनाचा पाया रचून त्यांचे भविष्य हे तेजोमय आणि उज्ज्वल केले जाते. अशा जिल्हा परिषदेच्या ८०० शाळांमध्ये बिल न भरल्यामुळे वीज जोड तोडण्यात आले आहेत. यामुळे या शाळा अंधारात आहेत. विद्येच्या माहेघरातच असं घडल्याने राजकीय पक्षांकडून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर टीका होऊ लागली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी नितीन राऊत (Nitin Raut) यांच्याबरोबरच सरकारवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.
''नितीन राऊतांनीवीज पुरवठा पूर्ववत करावा. अन्यथा सरकारला शॅाक बसल्याशिवाय राहणार नाही असा इशारा वाघ यांनी यावेळी दिला आहे.''
वाघ म्हणाल्या, पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ८०० शाळांची वीज तोडली गेली. तर इतर शाळांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. कोट्यावधी खर्चून ‘लॅवीश’ घर बनवणा-या ऊर्जा मंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अंधार आणल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. तर ऊर्जामंत्रींचे घर रोषणाईच्या झगमगाटात आहे पण पुणे हे विद्येचे माहेरघर अंधारात असल्याचे त्या म्हणाल्या आहेत.
महावितरणकडून बिल न भरल्यामुळे ८०० शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्याबाबत स्थायी समितीमध्ये सदस्यांनी प्रश्न उपस्थित करत, बिलाची रक्कम राज्य शासनाने भरावी, असा ठराव करण्याची मागणी केली होती. या आधीही शाळांचे थकीत बिल माफ करण्याबाबत राज्य शासनाने सध्या महावितरण विभागावर कर्जाचा बोजा अधिक असून, थकीत बिलांची रक्कम ग्रामपंचायतीमधील स्वनिधी किंवा १५ व्या वित्त आयोगातून द्यावी, अशा सूचना केल्या होत्या. याला सदस्यांनी विरोध केला होता. ग्रामपंचायतींकडे निधी नसल्याने शाळांची बिले भरायची कशी हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. मात्र, आज मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनीच ग्रामपंचायतींना पत्र काढत ही बिले ग्रामपंचायत निधीमधून भरावीत अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे एकीकडे ग्रामपंचायतीचे आणि दुसरीकडे शाळांच्या वीज बिलांचा बोजा ग्रामपंचायतींवर पडणार आहे.
ग्रामपंचायतींनी ग्रामनिधी मधून ही बिले भरण्याचे सुचवले
जिल्ह्यात एकूण ३ हजार ६३९ जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. त्यातील २ हजार ८४७ शाळांमध्ये वीजपुरवठा सुरळीत सुरू आहे, तर १२८ शाळांमध्ये बिल न भरल्यामुळे मीटर काढून नेण्यात आले आहे आणि ६६४ शाळांमधील मीटर जाग्यावर असले तरी वीजजोड तोडण्यात आले आहे. या शाळांमध्ये इ लर्निंग तसेच संगणक वापरता येत नसल्याने अध्ययनात अडचणी येत आहेत. यावर तातडीने कारवाई म्हणून स्थायी सभेत ग्रामपंचायतींनी ग्रामनिधी मधून ही बिले भरण्याचे सुचवले आहे.
तालुकानिहाय परिस्थिती वीजपुरवठा सुरू आणि कशात वीजपुरवठा बंद आकडेवारी
आंबेगाव - २०० (३४), बारामती - २४३ (३५), भोर - २०० (७४), दौंड - २३८ (५२), हवेली - २१२ (१४), इंदापूर - १८३ (१९४), जुन्नर - ३१० (४१), खेड - ३५६ (४६), मावळ - २४३ (३१), मुळशी - १४६ (५०), पुरंदर - १७५ (४३), शिरूर - २१२ (१४६), वेल्हा - १११ (३२)