पुणे : पुण्यातील रुग्णसंख्या घटल्यानंतर शहरातील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची संख्याही झपाट्याने कमी झाली आहे. शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या अवघी सहावर आली असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनाचा शहरात शिरकाव झाल्यानंतर झपाट्याने रुग्णसंख्या वाढत गेली होती. कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरिता ज्या भागात कोरोनाची रुग्ण आढळून आले आहेत त्या भागात प्रतिबंधित क्षेत्र निकष लागू करण्यात येत होते. याठिकाणी कडक उपाययोजना केल्या जात होत्या. प्रतिबंधित क्षेत्रांचा हा आकडा ८० च्या आसपास गेला होता. त्यामध्ये आता घट झाली आहे. टप्प्याटप्प्याने घट होत गेलेले हे प्रतिबंधित क्षेत्र आता अवघे सहाच राहिले आहेत.
शहराच्या मध्यवस्तीच्या असलेल्या कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील गाडीतळ पुतळा चौक ते जन्म-मृत्यू कार्यालय, नागझरी नाल्याच्या दक्षिणेस समर्थ पुल (दारुवाला पुल) ते फडके हौद ते लाल महाल चौक, लाल महाल चौक ते शिवाजीरस्त्याने रमामाधव चौक (गाडगीळ पुतळा चौक) असा परिसर. तसेच, धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील आंबेगाव बुद्रुक येथील सर्व्हे क्रमांक १६, वानवडी-रामटेकडीमधील वानवडी एसआरपीएफ क्र. १ व २, नगररोड-वडगाव शेरीअंतर्गत लोहगाव येथील सर्व्हे क्रमांक २९६, पोरवाल रस्ता, निंबाळकर कॉलनी, पार्क स्प्रिंग सोसायटी, हडपसरमधील फुरसुंगी, भेकराईनगर, ढमाळवाडी परिसर, ससाणेनगरचा काही भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहिर करण्यात आला आहे.