कान्हूरमेसाई : जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत समिती निवडणुकांसाठी लवकरच उमेदवारांची यादीही जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर प्रचाराचा खरा नारळ फुटणार आहे. प्रचारात ध्वनिक्षेपकांचा आवर्जून वापर केला जातो; पण या निवडणुकीत ध्वनिप्रदूषणाला लगाम घालण्यासाठी प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. प्रसंगी कारवाईचे संकेतही निवडणूक विभागाने दिले आहेत. ध्वनिवर्धकांचा मग ते एकाच जागी लावलेले असोत वा फिरत्या वाहनांवर बसविलेले असोत, सकाळी ६ वाजण्यापूर्वी व रात्री १० वाजल्यानंतर आणि संबंधित प्राधिकाऱ्यांची लेखी पूर्वपरवानगी घेतलेली असल्याशिवाय वापर करता येणार नाही. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटींचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. शिवाय, स्थानिक कायदे, त्या क्षेत्रातील सुरक्षितता आणि गरजेचा स्थानिक दृष्टिकोन तथा हवामान, सण व परीक्षांचा काळ लक्षात घेऊन ध्वनिक्षेपकांचा वापर करावा लागणार आहे. निवडणूक प्रचारासाठी वाहनांवर ध्वनिक्षेपके लावून प्रचार केला जातो. अनेकदा फिरती वाहने सर्वांकरिताच डोकेदुखी ठरत असतात. जि.प. व पंचायत समिती निवडणुकीमध्ये मात्र या बाबींवर कटाक्षाने लक्ष ठेवण्यात येणार आहे. यामुळे ध्वनिवर्धकाद्वारे ध्वनीप्रदूषण झाल्यास निवडणूक विभाग व प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
‘आवाज कुणाचा’वर आणणार लगाम
By admin | Published: January 24, 2017 1:48 AM