पुणे : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण अद्यापही कमी झाले नसून, निर्बंध देखील फारसे शिथिल केले नाहीत. यामुळेच यंदा देखील बकरी ईदवर गत वर्षीप्रमाणेच निर्बंध घालण्यात आले आहेत. कोरोना संसर्गामुळे राज्यातील सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्याने सर्व मुस्लीम बांधवांनी बकरी ईदची नमाज मस्जिद, ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता आपल्या घरीच अदा करावी, अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
जिल्ह्यातील मुस्लीम बांधवांनी बकरी ईद निमित्त अजित पवार यांची भेट घेऊन निर्बंध कमी करण्याची मागणी केली. यावर पवार यांनी अद्याप ही जिल्ह्याचा पाॅझिटिव्ह दर राज्यापेक्षा अधिकच आहे. शासनाच्या आदेशानुसार 'ब्रेक दि चैन' अंतर्गत जिल्ह्याचा निर्बंध स्तर निश्चित करून आवश्यक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मागीलवर्षीप्रमाणे यावर्षी देखील तसेच निर्बंध राहतील , असे पवार यांनी स्पष्ट केले.
बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक आहे, असेही गृह विभागाने स्पष्ट केले. यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहेत.