पुणे : राज्यावर कोरोनाचे संकट असून, यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत आहे. मात्र, तरीही पुण्याच्या मध्यवर्ती भागात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे, तर दुसरीकडे कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे गणेश विसर्जनाच्या दिवशी काही निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पुण्यातील सर्व दुकाने बंद राहणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. अत्यावश्यक सेवा व रेस्टॉरंट-हॉटेल सुरू राहणार असून, पिंपरी चिंचवडलाही हे निर्बंध राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यातील कोरोनासंदर्भातील उपाययोजनेच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. या निर्बंधांबाबत जिल्ह्यातले सर्व आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांनी मिळून हा निर्णय घेतला असल्याचंही पवार यांनी सांगितलं.
प्रत्येकवर्षी गणपतीला वाजत-गाजत निरोप दिला जातो. यावेळी कोरोनाचे संकट असल्याने विसर्जनानिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांना परवानगी देण्यात येणार नाही. तसेच अत्यावश्यक सेवा, रेस्टॉरंट-हॉटेलवगळता इतर सर्व दुकानं रविवारी पूर्णपणे बंद राहणार असल्याचे पवार यांनी सांगितले. हे निर्बंध पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि कॅन्टोन्मेंट क्षेत्रात लागू करण्यात येईल. सध्या कोरोनाबाधित रुग्ण आणि मृत्युदरात घट झाली आहे. रुग्णवाढीचा दर ०.०५ टक्क्यांवर आला आहे. शहर आणि जिल्ह्यात आजअखेर ९३ लाख नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यास येत्या २ ऑक्टोबरला बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
सिंहगड परिसर विकास आराखडा तयार
सिंहगड परिसराचा विकास आराखडा तयार आहे. खालील भागात किल्ल्याला शोभेल असे बांधकाम करून पोलीस चौकी उभारण्यात येणार आहे. सिंहगडावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय असल्याने तेथे वाहनतळाची सोय करण्यात येणार आहे. याशिवाय अन्य काही सोयीसुविधा उभारण्यात येणार असून, त्यासाठी १० एकर जमिनीचा वापर करण्यात येईल. दरम्यान, सिंहगड परिसरात आता टपऱ्या उभारू देण्यात येणार नाही. सुटसुटीत दुकानांची निर्मिती करून किल्ल्यावरील पर्यटनाला शिस्त लावणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.
प्रायोगिक तत्त्वावर ई-व्हेईकल सुरू
पीएमपीएमएलच्या प्रायोगिक तत्त्वावर ई-व्हेईकल सुरू करणार आहे. सद्यस्थितीत ३५-४५ ई-बस तयार आहेत. पायथ्यापासून वर जाण्यासाठी या वाहनांचा उपयोग होईल. त्यासाठी तिकीटही आकारले जाणार असून, स्थानिक तरुणांना गाइडचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.