लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “ज्या ठिकाणी ‘पॉझिटिव्हिटी रेट’ एखादा टक्का असेल तिथे निर्बंध कमी करण्याचा विचार आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याला होकार दर्शवला आहे,” असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पुणे मेट्रोच्या कार्यक्रमासाठी आले असताना पवारांनी शुक्रवारी (दि.३०) ही माहिती दिली. सरकार कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्याच्या विचारात आहे. दुपारी चारपर्यंत असणारी आत्ताची मर्यादा वाढवून रात्री ८ करण्यात येईल असे ते म्हणाले.
“सोमवार ते शुक्रवार नोकरदार काम करतात, त्यामुळे शनिवार-रविवार त्यांना मोकळीक हवी आहे. त्याचाही विचार सुरू आहे. मात्र निर्बंध शिथिल झाले तरीही मास्क, सॅनिटायझरचा वापर, गर्दी नाही हे नियम पाळावेच लागतील,” असे पवार म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर निर्बंध शिथिल करण्याविषयी चर्चा झाली आहे. ते सकारात्मक आहेत असे दिसते. अंतिम निर्णय तेच जाहीर करतील असे त्यांनी स्पष्ट केले. शहरी भागातले रुग्ण कमी होत असले तरी ग्रामीण भागात मात्र वाढत आहे. तेथील नागरिक मास्क, सॅनिटायझरचे नियम पाळत नाहीत. प्रशासनाने तिथे कडक भूमिका घ्यायला हवी. तशी सूचना त्यांना दिल्याचे पवार यांनी सांगितले.
चौकट
एक टक्क्याचा पल्ला अजून दूर
गेल्या महिन्याभरात कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र पुण्यात आहे. कोरोनामुळे अत्यवस्थ होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. कोरोना रुग्णांसाठी रुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात खाटा उपलब्ध आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचा तुटवडा भासत नाही. मृत्यूदरही कमी झाला आहे. मात्र लसीकरणाचा वेग अजूनही मंद आहे. तसेच दर शंभर रुग्णांची चाचणी केल्यानंतर आढळणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांची संख्याही (पॉझिटिव्हिटी रेट) सरकारला अपेक्षित असलेल्या एक टक्क्यावर अजून आलेली नाही.
चौकट
अशी आहे वस्तुस्थिती
दिवस ‘पॉझिटिव्हिटी रेट’ (टक्के)
शुक्रवार, ३० जुलै ३.३८
गुरुवार, २९ जुलै ३.९०
बुधवार, २८ जुलै ३.७०
मंगळवार, २७ जुलै ३.६७
सोमवार, २६ जुलै ३.०२
रविवार, २५ जुलै ३.५७