पुणे : राज्य सरकारने आणि पुणे महापालिका आयुक्तांनी शिवजयंती साजरी करण्यावर काही निर्बंध घातले आहे. मात्र पुण्यात शिवजयंतीच्या कार्यक्रमांना बंदी घातलेली असताना भाजप नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आणि ढोल ताशांच्या गजरात एका दुकानाचे उद्घाटन कसे काय होते आहे असा सवाल करत मनसेने भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. पुण्यातील कर्वे पुतळा चौक येथे महापौर, भाजपच्या लोकप्रतिनिधी नगरसेवक, आमदार यांच्या उपस्थितीत एका दागिन्यांच्या दुकानाचे आज उद्घाटन होणार होते. मात्र शिवजयंतीला बंदी असताना हा ढोल ताशांच्या गजरात हा कार्यक्रम होतो कसा असा सवाल विचारत मनसे नेत्यांनी या कार्यक्रमाला विरोध केला. नेत्यांनी पोलिस तक्रार केली आहे. तक्रारी नंतर पोलिस आल्यानंतर हा कार्यक्रम बंद करण्यात आला आहे.
“ शिवजयंती बंधने घालत महापौरांनी पुणेकरांना धमकी दिली आणि आज शेकडोंच्या उपस्थितीत दोलताशांचे पथक लावत उद्घाटन कार्यक्रम कसा काय आयोजित करण्यात येतो ?असे मनसेचे कोथरुड विभाग अध्यक्ष सुधीर धावडे म्हणाले. करोना च्या दृष्टीने सुरक्षिततेचे कुठलेही पालन होताना इथे दिसले नाही म्हणत त्यांनी अलंकार पोलीस स्टेशनला फोन करून गुन्हा दाखल करण्याची विंनती केली आहे.पोलिसांनी घटनास्थळी आल्यानंतर कार्यक्रम बंद करायला सांगितले.