लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गणेश उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सगळीकडे जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, कोरोनाच्या संकटकाळात मंदीचे सावट आणि बाजारपेठेत निरुत्साही वातावरण असताना देखील प्रत्येक चौकाचौकांतील मंडळे, गणेश उत्सवाची तयारी आपापल्या परीने करत आहेत. कोरोनाच्या निर्बंधामुळे मूर्तीची संख्या घटणार आहे. त्यामुळे मूर्तिकारांवरही संकट आहे.
काळेपडळ येथील मूर्ती बनवणाऱ्या दिलीप भाटी म्हणाले, यंदा गणेश उत्सव पंधरा दिवसांवर येऊन ठेपला तरी, गणेशमूर्तींना मागणी नाही. एरवी या दिवसांमध्ये आम्हाला खाण्यापिण्याची उसंत नसते. गेल्या तीन वर्षांपासून मूर्ती बनवून विकण्याचे काम करतो. दरवर्षी गणेश उत्सवनिमित्त मूर्ती घडवण्याचे काम जवळपास वर्षभर चालते. सहा इंचांपासून ते वीस फुटांपर्यंत वेगवेगळ्या उंचीच्या मूर्ती आम्ही इथे बनवतो. परंतु कोरोना विषाणूचे संकट आणि लॉकडाऊनमुळे या व्यवसायाला यंदा खीळ बसली. त्यात अर्थव्यवस्थेसमोरची आव्हानं पाहता, गणेश उत्सवावरदेखील मोठा परिणाम होईल अशी चिन्ह दिसत आहेत, अशा प्रकारची खंत भाटी यांनी व्यक्त केली.
मूर्तिकार, मूर्ती विक्रेते यांप्रमाणेच विविध सजावटीची साहित्य विक्रेते, पूजेचे साहित्य विक्रेते, फूल विक्रेते अशा बऱ्याच छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या व्यवसायावरही याचा परिमाण होणार आहे.
-----------------------
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गणपती उत्सवावर निर्बंध लादली आहेत. म्हणून यंदादेखील गणेश उत्सव साधेपणाने साजरा होणार. याचा परिणाम गणेशमूर्ती घडवणाऱ्या कारागिरांवर झाला असून गतवर्षी प्रमाणेच यंदादेखील गणेश मूर्तींची संख्या घटणार आहे. याचा मोठा परिणाम मूर्तिकारांच्या आर्थिक बाजूवर होणार आहे. गेल्या वर्षीपासून सरासरीपेक्षा खूप कमी मूर्ती कारागिरांनी बनवल्या असल्याचे कारागिरांनी सांगितले.
----------------------
गेली कित्येक वर्षे आम्ही गणपती मूर्तीचा व्यवसाय करत आहोत. जवळपास आम्ही जूनपासून मूर्ती बनवायच्या तयारीला लागतो. चार कामगार हाताखाली असायचे. त्यात माझ्यासह चार कामकारांचेही आर्थिक नुकसान झाले आहे.
- भारत सोळंके, मूर्ती विक्रेता
----------------
प्रशासनातील सततचे बदलते धोरण यामुळे यंदाच्या गणेश उत्सवावरती परिणाम होणार आहे. शहराची नशा म्हणजे ढोल-ताशा पथके. तेदेखील शांत असल्याचे पाहायला मिळत आहेत. याबरोबरच मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळ संभ्रमात आहेत. संभ्रमात असलेल्या चाळीस ते पन्नास टक्के मूर्तिकारांनी यंदा गणेशमूर्ती बनवल्या नाहीत. त्यामुळे भक्तांसाठी यंदा ‘श्री’च्या मूर्तीची कमतरता भासण्याची शक्यता आहे.
- अक्षय आखाडे, नागरिक
--------------------------