लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे असले तरी जिल्हा परिषद मुख्यालयात दररोज अभ्यागतांची प्रचंड गर्दी असते. यामुळेच आता जिल्हा परिषद मुख्यालयात प्रवेशासाठी निर्बंध आणले जाणार आहेत. टपाल किंवा कार्यालयीन कामकाजासाठी कागदपत्रे स्वीकारण्यासाठी इमारतीच्या खालीच काउंटर सुरू करण्यात येणार असून, अभ्यागत यांच्या भेटीसाठी पासची व्यवस्था करण्यात येणार आहे.
गेल्या पंधरा-वीस दिवसांत शहर आणि जिल्ह्यात प्रचंड वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु नागरिकांना अद्यापही याबाबत गांभीर्य नाही. यामुळेच तोंडाला मास्क नसेल तर जिल्हा परिषद मुख्यालयात प्रवेश दिला जाऊ नये, असे कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत प्रशासन आहे. सध्या मार्चअखेर असल्यामुळे जिल्हा परिषद मुख्यालयात गर्दी वाढली आहे. नागरिकांकडून कोरोनाविषयक नियमावलीचे उल्लंघनदेखील होत असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा परिषद प्रशासनाकडून मुख्यालयात कोरोनाविषयक निर्बंध लागू केले जाणार आहेत.
राज्य शासनाने शासकीय कार्यालय संदर्भात स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन निर्णय घेण्याचे अधिकार प्रशासनाला दिले आहेत. शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या उच्चांकी वाढत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी कोरोना निर्बंध संदर्भातील उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. यासंबंधी बोलताना सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले म्हणाले, तू आधी जिल्हा परिषद मुख्यालय इमारतीतील गर्दी कमी करण्यासाठी तसेच संसर्ग होऊ नये म्हणून अनावश्यक बाबी कमी केल्या जातील. अभ्यासात त्यांना भेटण्यासाठी प्रत्येक विभागातून पास देण्याची व्यवस्था करण्याचा विचार सुरू आहे.