लोणी काळभोर : अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा व्हावा म्हणून महावितरण दर गुरुवारी त्रिसूत्री कार्यक्रमांतर्गत वेगवेगळ्या प्रतिबंधक उपाययोजना करणार आहे. याचा फायदा सर्वसामान्य ग्राहकांना होईल, अशी माहिती महावितरणचे उपकार्यकारी अभियंता कल्याण गिरी यांनी दिली. महाराष्ट्र राज्य वीजवितरण कंपनीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या त्रिसूत्री कार्यक्रमांतर्गत कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत व पुणे-सोलापूर महामार्गावरील ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा व्हावा म्हणून आज एक अभियान राबविण्यात आले, त्या वेळी कल्याण गिरी बोलत होते. या वेळी भाजपचे युवा नेते चित्तरंजन गायकवाड, महावितरणचे लोणी काळभोर येथील सहायक अभियंता विकास पानसरे, त्यांचे सहकारी थेऊरचे सहायक अभियंता भालचंद्र जाधव, उरुळी कांचनचे सहायक अभियंता सचिन पवार, कुंजीरवाडीचे सहायक अभियंता अभिराज कोडिलकर, उरुळी कांचन उपविभागाचे सहायक अभियंता नागेश खडतरे आदी उपस्थित होते. गिरी म्हणाले, ‘‘महावितरणचे ७८ कर्मचारी तसेच दोन ठेकेदारांचे २२ कर्मचारी असे सुमारे शंभर कर्मचाऱ्याच्या मदतीने हे अभियान राबविण्यात येत आहे. दिवसभरात फुलेनगर, संस्कृती हॉटेल व काळे पेट्रोलपंप या तीन ठिकाणी तीन नवीन रोहित्रे बसविण्यात आली. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ७८ ठिकाणच्या झाडे छाटण्यात आली आहेत. ५८ ठिकाणी वीजवाहक तारांची प्रतिबंधक दुरुस्ती करण्यात आली. वीज ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा व्हावा म्हणून प्रतिबंधक दुरुस्ती, बीलदुरुस्ती, नवीन वीजजोडणी आदी कामे करण्यात आली. महावितरणचे पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता रामराव मुंडे, अधीक्षक अभियंता सुनील पावडे व कार्यकारी अभियंता राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात अशी प्रतिबंधक कामे यापुढे ही प्रत्येक आठवड्याला करण्यात येणार आहेत. दोन महिने जास्त कामे असतील; नंतर मात्र कामांचे प्रमाण कमी होईल, असा अंदाज या वेळी कल्याण गिरी यांनी व्यक्त केला. (वार्ताहर)
‘त्रिसूत्री कार्यक्रमांतर्गत प्रतिबंधक उपाययोजना’
By admin | Published: December 12, 2015 12:41 AM