पुणे : गणेशोत्सव, निवडणुका, आणिबाणी किंवा संकटसमयी पोलिसांना सलग दिवसांमध्ये काम करावे लागते. अशावेळी त्यांना मानसिक व शारीरिक ताणतणावाला सामोरे जावे लागते. यात महिलांना अनेक प्रश्न भेडसावतात. यावर सक्षम पर्याय देण्याचा स्तुत्य उपक्रम रोटरी क्लब आॅफ पुणे एनआयबीएम या क्लबने केला आहे. त्यांनी महिला पोलिसांसाठी पुणे पोलीस आयुक्तालयात आधुनिक सुविधांनी युक्त विश्रांतीस्थळाचे काम पूर्ण केले आहे. या प्रकल्पाचे हस्तांतरण व उदघाटन पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्राज फाऊंडेशनच्या अध्यक्षा परिमल चौधरी, सहपोलीस आयुक्त रविंद्र कदम, पोलीस उपायुक्त शेषराव सुर्यवंशी, संतोष जोशी, अभय गाडगीळ, मनोज कार्येकर आणि रोटरीचे सभासद मोठया संख्येने उपस्थित होते. रोटरीने क्लबने महिला पोलिसांसाठी केलेल्या या प्रकल्पाचे कौतुक करताना शुक्ला म्हणाल्या, पुण्यात गणेशोत्सवासह इतरही काही उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. या कालावधीत किंवा कधी कधी आपत्कालीन परिस्थितीमध्ये पोलिसांना सातत्यपूर्वक ड्युटी करावी लागते. यावेळी महिला पोलिसांची कुचंबणा होते. यामुळे महिला पोलिसांच्या आरोग्यावर देखील याचा दुष्परिणाम होत असतो. महिलांच्या बाबतीतला या प्रश्नावर निमित्तमात्र काही दिवस आवाज उठविला जातो. परंतु, कार्यवाही करण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. रोटरी क्लबच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेले विश्रांतीस्थळ हे यासर्वांमध्ये प्रेरणादायी आणि तितकेच अनुकरणीय आहे. गणेशोत्सव,आणीबाणी व संकट समयी दिवसभर काम करावे लागते. त्यांच्यावर मानसिक व अतिश्रमाने येणारा ताण हलका करण्यासाठी लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रकल्पात सहा बंक बेडस,अठरा लॉकर्स सुविधा, मोठा आरसा, दोन स्वच्छतागृहे, एक स्नानगृह, ड्रेसिंग टेबल, लिखाणासाठी टेबल, सहा खुर्च्या पुरवण्यात आल्या आहेत. परवीन प्रसाद यांनी सूत्रसंचालन केले तर स्वप्नीला माळवदे यांनी आभार मानले.
महिला पोलिसांसाठी सुसज्ज ‘विश्रांतीस्थळ ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 8:24 PM
गणेशोत्सव, निवडणुका, आणिबाणी किंवा संकटसमयी पोलिसांना सलग दिवसांमध्ये काम करावे लागते. यात महिलांना अनेक प्रश्न भेडसावतात.
ठळक मुद्देमहिला पोलिसांच्या आरोग्यावर ताणतणावाचा दुष्परिणाम