सोलापूर : ज्यांनी-ज्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांना आम्ही सोडणार नाही. छगन भुजबळ दोन वर्षे तुरुंगात राहिले. सिंचन घोटाळ्याची केस हायकोर्टात चालू आहे. हायकोर्टाला आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे आम्ही दिली आहेत. कोणत्याही क्षणी हायकोर्टाचा निर्णय येऊ शकतो, असे सूचक विधान करून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्टÑवादीचे नेते अजित पवार यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, असे मानले जात आहे. सोलापूर जिल्हा बँकेबाबत आम्हाला जे करायचे, ते आम्ही लवकरच ठरवू, असा गर्भीत इशाराही त्यांनी यावेळी दिला.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना चंद्रकांत दादांनी केलेल्या या वक्तव्याने नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज भरला. तत्पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत महसूलमंत्री पाटील म्हणाले, मी सहकारमंत्री होतो, त्यावेळी कोल्हापूर जिल्हा बँकेवर कारवाई केली. आता सुभाष देशमुख सहकारमंत्री आहेत. आम्ही कोणालाही सोडलेले नाही. रिझर्व्ह बँकेने एखादी जिल्हा बँक बरखास्त केली, तर संचालकांना दहा वर्षे निवडणूक लढविता येणार नाही, असा कायदा आम्ही केला. उच्च न्यायालयात या कायद्याला आव्हान देता आले नाही. सोलापूरजिल्हा बँकेच्या बाबतीत आम्ही योग्य निर्णय घेऊ़
संजय शिंदे यांच्या तीन प्रकरणाची चौकशी आम्ही करणार आहोत. त्यांनी साखर कारखान्यासाठी शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घेतलेले आहे. त्याची आकडेवारी मोठी आहे. रत्नाकर गुट्टेला जेलमध्ये जावे लागले. सहकारमंत्री सुभाष देशमुख हे संजय शिंदेंचा सोक्षमोक्ष लावतील, असा इशाराही महसूलमंत्र्यांनी दिला.काय आहे सिंचन घोटाळा?७२ हजार कोटींच्या कथित सिंचन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात २७ पानी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यात सिंचन प्रकल्पांची किंमत वाढविणे, विदर्भ सिंचन विकास महामंडळाने दहा प्रकल्पांना मान्यता देताना किमतीत भरमसाठ वाढ केली, बांधकामात अनियमितता असा ठपका ठेवण्यात आला आहे. या घोटाळाप्रकरणी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही आरोप ठेवण्यात आला आहे.मी कोणत्या साखर कारखानदाराशी सेटलमेंट केली, हे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दाखवून द्यावे. त्यांनी कोणत्या अधीक्षक अभियंता, ठेकेदारांकडून किती पैसे घेतले, डांबरात आणि मातीत किती पैसे खाल्ले याचे पुरावे देतो. ते राज्याचे अवैध धंदे करणारे दोन नंबरवाले मंत्री आहेत.- खा. राजू शेट्टी, शेतकरी संघटनेचे नेते