देहूरोड - कोणताही सण असो अगर घरात शुभकार्य असो, घराच्या अंगणात शेणाचा सडा टाकून आकर्षक रांगोळी काढण्याचा प्रघात आपल्याकडे होता. मात्र काळाच्या ओघात शेणाचा सडा व त्यावर काढण्यात येणारी रांगोळी शहरी भागातून पूर्णत: कालबाह्य झाली असून, ग्रामीण भागातूनही हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. दिवाळीसारख्या मोठ्या सणालादेखील केवळ रोषणाईचा सण म्हणून आकाशकंदील व चिनी बनावटीच्या माळा लावण्यात धन्यता मानली जात असल्याचे सार्वत्रिक चित्र दिसू लागले आहे.आपल्या परंपरेनुसार वर्षभर साजऱ्या करण्यात येणाºया विविध सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र दिवाळी हा सर्वांत मोठा सण मानला जात असून, मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. सासरी गेलेल्या मुली दिवाळी सणासाठी माहेरी येतात. नोकरी-धंद्यानिमित्त घरापासून दूर असलेले सर्वजण दिवाळी एकत्र साजरी करतात. गावी आलेले सर्व नातेवाईक एकमेकांना भेटतात. दिवाळी सण विविध कुटुंबांत साजरा करण्याची पद्धत वेगवेगळी असली, तरी दिवाळी सण वैयक्तिक पातळीवर साजरा करण्याकडे कल दिसत आहे.मांगल्याचे प्रतीक म्हणून रांगोळी काढण्याची सर्वत्र प्रथा होती. ग्रामीण भागासह शहरी भागात भल्या पहाटे उठून महिलावर्ग घरासमोर शेणाचा सडा टाकून आकर्षक रांगोळ्या काढण्यात मग्न असे. त्यामुळे घराच्या परिसराची व घराच्या अंगणाची शोभा वाढत असे. मात्र सर्वत्र नागरीकरण वाढत गेले आणि काळ बदलत गेला, तशी अंगण ही संज्ञा संकुचित होऊ लागली आहे. शहरी भागात जागेच्या कमतरतेमुळे अंगण ही संज्ञाच कालबाह्य ठरू पाहत आहे. सदनिका व अपार्टमेंट संस्कृती वाढत असल्याने सदनिकेच्या दारात छोटीशी रांगोळी काढण्याची प्रथा रूढ झाली असून, केवळ औपचारिकता म्हणून दिवाळीतील रांगोळी काढली जात आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातही शेणाचा सडा व रांगोळी काढण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे.रांगोळीच्या दरातही वाढसडा-सारवण शक्य नसले, तरीही रांगोळीची आवड टिकून आहे. त्यासाठी बाजारात विविध रंगांत आकर्षक रांगोळ्या उपलब्ध आहेत. मात्र रांगोळीचे विविध रंग, गालिचा रांगोळीचे दरही वाढत आहेत. महागाईच्या काळात जास्तीची रांगोळी खरेदी करणे परवडत नसल्याची तक्रार महिलाकंडून करण्यात येत आहे.
नागरीकरणाचा परिणाम : शेणाचा सडा-सारवण झाले कालबाह्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2018 1:20 AM