" हा निकाल म्हणजे जनतेने महाविकास आघाडीवर दाखवलेला विश्वास अन् भाजपाला दिलेली चपराक.."
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 06:57 PM2020-12-04T18:57:28+5:302020-12-04T19:19:35+5:30
चंद्रकांत पाटील यांना उत्तर देण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील जनतेने ते दिले आहे.
पुणे: विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदार संघात मिळालेला विजय म्हणजे राज्यातील शिक्षक व पदवीधर मतदारांनी महाविकास आघाडीवर दाखवलेला विश्वास व भारतीय जनता पार्टीला दिलेली चपराक आहे, अशा शब्दात राज्याचे सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी महाविकास आघाडीच्या विजयाचे वर्णन केले आहे.
विधानपरिषद शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार प्रा. जयंत आसगावकर राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्यासमवेत काँग्रेस भवनमध्ये आले होते. त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना पक्षांच्या आयोजित संयुक्त पत्रकार आयोजित ते बोलत होते. कदम म्हणाले, गेल्या वर्षभर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कसे चालेल याविषयी शंका उपस्थित केल्या जात होत्या. मात्र सोनिया गांधी, शरद पवार व उद्धव ठाकरे यांंनी एकमताने उत्तम काम केले त्याचीच ही पोचपावती आहे. तसेच सरकारचे काम आवडल्यामुळेच काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी उच्चांकी मतदान करण्यात आले. तसेच चंद्रकांत पाटील यांना उत्तर देण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील जनतेने त्यांना ते दिले आहे. भाजपामूळे बेरोजगारी वाढली.त्याचाच राग शिक्षक व पदवीधर ऊमेदवारांनी व्यक्त केला आहे.
शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले,मुख्यमंत्र्यांवर भाजपाने आरोप केले त्याची चपराक मतदारांनी भाजपाला लगावली
पुणे शिक्षक मतदारसंघात प्रा. जयंत आसगावकर यांचा विजय निश्चित
पुणे शिक्षक मतदारसंघात प्रा. जयंत आसगावकर हे विजयी झाले आहे. मात्र त्याची अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे. पुणे शिक्षक मतदार संघात पहिल्या पसंती क्रमांकाची सर्वाधिक मते पडलेल्या महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर यांना १६ हजार ८७४ मते पडली होती. मात्र, विजयी आकडा गाठण्यासाठी आसगावकर यांना बरीच वाट पाहावी लागली. पहिल्या पसंती क्रमांकात सर्वाधिक मते मिळालेल्या आसगावकर यांना विजयासाठी २४ हजार ११४ मतांची आवश्यकता होती.