पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे १८ फेब्रुवारी २०१८ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल येत्या गुरूवारी (दि.२१) दुपारी ३ वाजता www.mscepune.in, https://puppss.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर प्रसिध्द केला जाणार आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्याचा निकाल संकेस्तस्थळावर पाहता येईल.
परीक्षा परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी),शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा,विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी)चा अंतरिम (तात्पुरता)निकाल परिषदेकडून प्रसिध्द केला जाणार आहे.विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये २१ जून ते ३० जून या कालावधीत आॅनलाईन अर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरिता ५० रुपये या प्रमाणे शुल्काची रक्कम आॅनलाईन पध्दतीने भरणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांचे नाव,आडनाव,वडिलाचे नाव ,आईचे नाव ,शहरी/ ग्रामीण अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरूस्तीसाठी 30 जून पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये आॅनलाईन अर्ज उपलब्ध करून दिले आहेत.या आॅनलाईन अर्जा व्यतिरिक्त इतर कोणत्याही पध्दतीने पाठविलेल्या अर्जांचा स्वीकार केला जाणार नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यात व मुदतीत अर्ज सादर करावे,असे आवाहन परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी केले आहे.